(पुणे)
पुण्यात २५ वर्षांच्या तरुणीच्या पोटात वाढलेली मोठी गाठ तपासण्याकरिता उपचारासाठी दाखल झाल्यावर आश्चर्यकारक निदान समोर आले आहे. सुरुवातीला ही गाठ मोठ्या गर्भाशयातील फायब्रॉईड असल्याचा संशय होता; मात्र शस्त्रक्रियेनंतर ती गर्भाशयाशी संबंधित नसून पोटाच्या आतड्यांच्या भोवती असलेल्या मेसेन्टरी भागातून निर्माण झालेली स्पिंडल सेल ट्यूमर असल्याचे स्पष्ट झाले. या वयात एवढ्या मोठ्या ट्यूमरची ही जगातील अत्यंत दुर्मिळ घटना असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.
ही कठीण शस्त्रक्रिया स्त्रीरोगतज्ञ डॉ. गौरी जगदाळे यांच्या नेतृत्वाखाली मदरहुड हॉस्पिटल, खराडी येथे यशस्वीरीत्या पार पडली. शस्त्रक्रियेदरम्यान १४ सेमी लांब, १५ सेमी रुंद व ५ सेमी उंच असलेली गाठ संपूर्णपणे सुरक्षितपणे काढून टाकण्यात आली. पुढील तपासणीत ही गाठ स्पिंडल सेल ट्यूमर असल्याचे निदान झाले.
याशिवाय, रुग्णाच्या ऊतींच्या मॉलिक्युलर चाचणीत पोटातील प्रसारित क्षयरोग देखील आढळला. म्हणजेच, एका रुग्णात दोन दुर्मिळ आजार – मेसेन्टरी ट्यूमर व पोटातील प्रसारित क्षयरोग – एकाच वेळी आढळले, हे जागतिक पातळीवर अत्यंत दुर्मिळ मानले जाते.
अशी माहिती आहे की, स्पिंडल सेल ट्यूमरचा दहा लाख लोकसंख्येवर फक्त २ ते ३ रुग्णांवर प्रादुर्भाव होतो, तर पोटातील प्रसारित क्षयरोगाचे प्रमाण एकूण क्षयरोगाच्या रुग्णांमध्ये फक्त २–३% आहे. १ कोटी लोकसंख्येत केवळ ७ जणांवर हा आजार आढळतो.
डॉ. गौरी जगदाळे म्हणाल्या, “सुरुवातीला या रुग्णात सामान्य फायब्रॉईड असल्याचा निष्कर्ष निघाला; मात्र शस्त्रक्रिया आणि तपशीलवार तपासणीनंतर दुर्मिळ निदान समोर आले. पोटातील गाठींच्या निदानासाठी व्यापक तपासणी आणि मॉलिक्युलर चाचण्या करणे अत्यंत आवश्यक आहे.”
सध्या रुग्णाची प्रकृती स्थिर असून, ऑंकोलॉजिकल फॉलो-अप आणि क्षयरोगावरील उपचार सुरू आहेत. पुढील काही वर्षे नियमित फॉलोअपद्वारे गाठ पुन्हा वाढत नाही यावर लक्ष ठेवले जाईल, असे डॉ. जगदाळे यांनी सांगितले.

