(छत्रपती संभाजीनगर)
सिल्लोड तालुक्यातील धानोरा गावात हृदयद्रावक दुर्घटना घडली असून विहिरीच्या कामादरम्यान मातीचा ढिगारा अंगावर कोसळल्याने वडील आणि दोन मुलांचा जागीच मृत्यू झाला. एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. ही दुर्घटना 9 मे रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली. मृतांमध्ये बाजीराव सर्जेराव काकडे (55), आजिनाथ बाजीराव काकडे (25) आणि शाम बाजीराव काकडे (22) यांचा समावेश आहे.
विहिरीत पाणी साचल्याने उतरले, अन् काळाने घाला घातला
मिळालेल्या माहितीनुसार, धानोरा शिवारात काकडे कुटुंबाच्या शेतात गेल्या महिनाभरापासून विहिरीचे खोदकाम सुरू होते. सुमारे 50 फूट खोलीपर्यंत मातीच असल्याने विहिरीला कडे टाकण्याचे काम सुरू होते. विहिरीत पाणी साचल्यामुळे पाणी उपसण्यासाठी मोटार बसवण्यात आली होती. मात्र, मोटारमध्ये बिघाड झाल्यानंतर तो तपासण्यासाठी बाजीराव काकडे आणि त्यांचे दोन्ही मुलगे दोरीच्या साहाय्याने विहिरीत उतरले. त्याचवेळी विहिरीचे नव्याने बांधलेले 14 कडे आणि सुमारे 25 फूट मातीचा ढिगारा अचानक कोसळला. तिघेही मातीखाली दबले गेले आणि त्यांना बाहेर पडण्याची संधीही मिळाली नाही.
रात्रभर सुरू होतं बचावकार्य
रात्री उशिरापर्यंत तिघे घरी परतले नाहीत, त्यामुळे बाजीराव काकडे यांच्या पत्नी मीराबाई यांनी विहिरीकडे धाव घेतली. तेव्हा त्यांना दुर्घटनेची माहिती मिळताच त्यांनी आरडाओरडा करून ग्रामस्थांना बोलावले. यानंतर रात्री 1 वाजल्यापासून सकाळी 7 वाजेपर्यंत दोन जेसीबी आणि दोन पोकलेनच्या सहाय्याने मातीचा ढिगारा हटवण्याचे काम सुरू होते. मोठ्या प्रयत्नांनंतर तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. सकाळी 7.30 वाजता तिघांना सिल्लोड उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
गावात शोककळा
रविवारी सकाळी 11.30 वाजता धानोरा गावात शोकाकुल वातावरणात तिघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे संपूर्ण गाव हादरले असून काकडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. बाजीराव काकडे यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी आणि सून असा परिवार आहे. तर मृत आजिनाथ यांच्या पश्चात पत्नी आणि एक लहान मुलगी आहे. श्याम काकडे हा अविवाहित होता.

