( पुणे )
पती-पत्नीतील वादातून घडणाऱ्या धक्कादायक घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असतानाच पिंपरी-चिंचवडमधील तळेगावमधून एक हादरवणारी घटना समोर आली आहे. तळेगाव एमआयडीसी परिसरातील ‘अर्बन लाईफ टॉवर’ मधील या उच्चभ्रू सोसायटीच्या आठव्या मजल्यावरून पडून 34 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून परिसरात खळबळ उडाली आहे. मृत महिलेचे नाव प्रतिभा मनीष शंकर (वय 34) असे असून ही घटना तळेगाव एमआयडीसी परिसरातील ‘अर्बन लाइफ टॉवर’ या सोसायटीत घडली. पोलिसांनी या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.
कुटुंबात वाद झाल्याची चर्चा
समोर आलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री प्रतिभा शंकर यांचा कुटुंबात वाद झाल्याची चर्चा आहे. वाद झाल्यानंतर त्या घराच्या बाल्कनीत गेल्या. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये त्या बाल्कनीच्या रेलिंगला धरून लटकताना दिसत आहेत. यावेळी घरातील काही सदस्य बाल्कनीत उपस्थित असल्याचेही व्हिडीओमध्ये दिसून येत आहे. हा प्रकार लक्षात येताच त्यांच्या पतीने धाव घेत त्यांचा हात पकडून त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. काही क्षणांसाठी त्यांनी पत्नीला धरून ठेवलं होतं. मात्र, परिस्थिती हाताबाहेर गेल्यानं काही सेकंदात त्यांचा हात सुटला आणि प्रतिभा शंकर या थेट आठव्या मजल्यावरून खाली कोसळल्या. परिसरातील लोक आरडाओरडा करत होते. मात्र काही क्षणात त्यांचा हात निसटला आणि त्या थेट खाली कोसळल्या. बाल्कनीला लटकत असताना तिला वाचवण्यासाठी खाली असलेले नागरिक ओरडत होते, पण क्षणार्धात तिचा हात सुटला आणि घात झाला.
व्हिडीओमुळे अनेक प्रश्न उपस्थित
या व्हिडीओमध्ये एक लहान मुलगाही बाल्कनीत दिसत असल्याने या घटनेबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. महिलेला वाचवण्यासाठी नेमके प्रयत्न झाले का? घरातील सदस्यांनी हस्तक्षेप केला का? याबाबत सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास सुरू केला असून व्हायरल व्हिडीओचीही पडताळणी केली जात आहे. घटनेनंतर अर्बन लाइफ टॉवर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सोशल मीडियावर VIDEO व्हायरल
रविवारी सकाळपासून या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. उच्चभ्रू सोसायटीत घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये धक्का व्यक्त केला जात आहे. पोलिसांकडून सध्या अधिक तपास सुरू असून मृत्यूमागील नेमके कारण स्पष्ट करण्यासाठी संबंधितांचे जबाब नोंदवले जात आहेत.

