(मुंबई)
क्रिकेट टीम इंडियाचा स्टार ऑलराउंडर हार्दिक पांड्या पुन्हा एकदा वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. नताशाशी घटस्फोटानंतर त्याचे नाव जास्मिन वालियाशी जोडले गेले होते. आता हार्दिकच्या नावाची चर्चा अभिनेत्री माहिका शर्मासोबत रंगत आहे. सोशल मीडियावर दोघांच्या कथित नात्याबद्दल जोरदार चर्चा सुरू असून, चाहत्यांमध्ये ‘ही माहिका नेमकी कोण?’ याविषयी उत्सुकता वाढली आहे.
माहिका शर्मा कोण आहे?
माहिका शर्मा ही मॉडेल, अभिनेत्री आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आहे. ती इंस्टाग्रामवर अत्यंत सक्रिय असून, फॅशन आणि फिटनेससंबंधी व्हिडिओ ती वारंवार शेअर करते. दिल्लीतील नेव्ही चिल्ड्रन स्कूलमधून शालेय शिक्षण घेतल्यानंतर तिनं अर्थशास्त्र आणि वित्तशास्त्राचा अभ्यास केला आणि विविध इंटर्नशिप्सही केल्या.
अभिनयाच्या कारकिर्दीत माहिका रॅपर रागाच्या म्युझिक व्हिडिओमध्ये दिसली असून, ऑस्कर विजेता दिग्दर्शक ऑर्लॅंडो वॉन आइन्सीडेलच्या इनटू द डस्क या प्रकल्पात काम केलं आहे. २०१९ मध्ये प्रदर्शित झालेल्या पीएम नरेंद्र मोदी चित्रपटात ती विवेक ओबेरॉयसोबत झळकली होती. जाहिराती, चित्रपट आणि रॅम्प वॉकमधूनही माहिकाने स्वतःची छाप सोडली आहे. तिने रितू कुमार, अनिता डोंगरे, तरुण ताहिलियानी, मनीष मल्होत्रा आणि अमिता अग्रवाल यांसारख्या प्रख्यात डिझायनर्ससाठी रॅम्प वॉक केला असून, २०२४ मध्ये इंडियन फॅशन अवॉर्ड्समध्ये ‘मॉडेल ऑफ द इयर’ पुरस्कार जिंकला आहे. सध्या ती २४ वर्षांची असून, लीन सिक्स सिग्मा ब्लॅक बेल्ट सर्टिफिकेशन आणि योगा टीचिंगचे प्रशिक्षणही तिने घेतले आहे.
अफेअरच्या चर्चा
माहिकाच्या इन्स्टाग्रामवर सुमारे ४१ हजार फॉलोअर्स आहेत. तिच्या एका व्हिडिओमध्ये मागे हार्दिक पांड्या दिसल्याचा दावा चाहत्यांनी केला. त्यात माहिकाच्या बोटावर २३ हा अंक दिसत होता, जो हार्दिकचा जर्सी नंबर आहे. यानंतरच सोशल मीडियावर दोघांच्या अफेअरच्या चर्चा रंगू लागल्या. मात्र, या प्रकरणावर हार्दिक किंवा माहिका – दोघांकडूनही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. सध्या हार्दिक पांड्या दुबईत आशिया कप २०२५ स्पर्धेत व्यस्त आहे.

