( अमरावती )
तलाव आणि नदी परिसरात फोटोशूट करताना सुरक्षिततेकडे दुर्लक्ष किती महागात पडू शकतं, याचा प्रत्यय देणारी हृदयद्रावक घटना अमरावतीमध्ये समोर आली आहे. फोटोशूटदरम्यान पाण्यात बुडणाऱ्या बहिणीला वाचवण्यासाठी तलावात उडी घेतलेल्या भावासह चार अल्पवयीन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे अमरावतीतील महाजनपुरा परिसरात शोककळा पसरली आहे.
रविवारी दुपारी मार्डी मार्गावरील डॉ. राजेंद्र गोडे महाविद्यालयामागील घातखेडा तलाव परिसरात ही दुर्घटना घडली. मृतांमध्ये सोनाली नरेंद्र जोशी (16), आदित्य नरेंद्र जोशी (12), गजानन काकडे (13) आणि पायल बबलू पंडित ((21) यांचा समावेश आहे. भाऊ-बहिणींचाही मृतांमध्ये समावेश असल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
फोटोशूटदरम्यान घडली दुर्घटना
महाजनपुरा परिसरातील काही मुलं रविवारी सहलीसाठी तलाव परिसरात गेली होती. सुट्टीचा दिवस असल्याने जवळपास 15 मित्र-मैत्रिणी घातखेडा परिसरात स्वयंपाक व जेवण करण्याचा प्लॅन करून ते गेले होते. जेवण झाल्यानंतर काही जणांना बंधाऱ्याच्या काठावर फोटो आणि रील बनवण्याची इच्छा झाली. जेवणानंतर सोनाली जोशी तलावाजवळ फोटोशूट करत असताना अचानक खोल पाण्यात गेली. ती बुडत असल्याचं लक्षात येताच तिचा भाऊ आदित्य जोशी, पायल पंडित आणि गजानन काकडे यांनी तिला वाचवण्यासाठी तलावात उड्या घेतल्या.
एकाला वाचवण्याच्या प्रयत्नात एकामागून एक असे चौघे पाण्याच्या खोल डोहात गेले. ही साखळी दुर्घटना पाहणाऱ्या उर्वरित मित्रांनी किंकाळ्या फोडल्या पण त्याचा काहीच फायदा झाला नाही. तलावातील खोल चिखल आणि पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने चौघंही पाण्यात अडकले आणि काही क्षणात बुडाले. चारही जणांना बुडताना पाहून तलावाच्या काठावर असलेल्या इतरांनी आरडाओरड सुरू केली. पण परिसरात त्यांना वाचवण्यासाठी कुणीही नव्हते, त्यामुळे एका मुलीने गावात धावत जाऊन तेथील नागरिकांना या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी पोलिसांना माहिती दिली.
बचाव पथकाचे प्रयत्न निष्फळ
घटनेची माहिती मिळताच फ्रेझरपुरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रोशन शिरसाट यांच्या नेतृत्वाखालील पथक घटनास्थळी दाखल झाले. जिल्हा आपत्ती निवारण आणि बचाव पथकाने तातडीने शोधमोहीम सुरू केली. काही तासांच्या प्रयत्नानंतर चौघांचे मृतदेह तलावातून बाहेर काढण्यात आले. रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी चौघांनाही मृत घोषित केले. मृतदेह जेव्हा जिल्हा सामान्य रुग्णालयात आणण्यात आले तेव्हा त्यांच्या कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. या घटनेनंतर महाजनपुरा परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये तीव्र हळहळ व्यक्त होत आहे. परिसर संवेदनशील असल्याने पोलिसांकडून अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

