( मुंबई )
राज्यात कर्करोगाचा वाढता धोका आणि सर्वसामान्यांना परवडणाऱ्या उपचारांची उपलब्धता याबाबत आमदार निरंजन डावखरे यांनी बुधवारी (4 मार्च) विधान परिषदेत लक्षवेधी सूचनेद्वारे महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला. बदलती जीवनशैली, प्रदूषण आणि वाढता ताणतणाव यामुळे कर्करोगाचे प्रमाण सर्व वयोगटांमध्ये वाढत असल्याची चिंता त्यांनी व्यक्त केली.
या प्रश्नांना उत्तर देताना आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी राज्य सरकारकडून कर्करोग रुग्णांसाठी मोठ्या प्रमाणावर उपाययोजना करण्यात येत असल्याची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजना अंतर्गत राज्यातील 761 सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्ये कर्करोगावर मोफत उपचार उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
निरंजन डावखरे यांनी सभागृहात सांगितले की, कर्करोग हा आता केवळ वृद्धांपुरता मर्यादित राहिलेला आजार नसून लहान मुले, तरुण आणि मध्यमवयीन नागरिकांमध्येही त्याचे प्रमाण वाढत आहे. विशेषतः *मुंबई*सारख्या महानगरांमध्ये वाढत्या वायुप्रदूषणामुळे फुफ्फुसाच्या कर्करोगाचा धोका वाढत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले. तसेच महिलांमध्ये स्तन आणि गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचे वाढते प्रमाण लक्षात घेता लवकर निदान आणि परवडणाऱ्या उपचारांची नितांत गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
यावेळी त्यांनी शासनाकडे काही थेट प्रश्न उपस्थित केले. बदलत्या जीवनशैलीमुळे वाढणाऱ्या कर्करोगाच्या घटनांवर सखोल संशोधन केले जाणार का, उपचारांचा प्रचंड खर्च लक्षात घेता गरीब आणि मध्यमवर्गीय नागरिकांसाठी कोणत्या ठोस योजना आहेत, तसेच प्रदूषण आणि महिलांमधील कर्करोगाच्या वाढत्या घटनांवर नियंत्रणासाठी कोणती प्रतिबंधात्मक आणि जनजागृतीची पावले उचलली जाणार, असा सवाल त्यांनी केला.
उत्तर देताना आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितले की, कर्करोगाच्या निदानासाठी अत्यंत खर्चिक असलेली PET स्कॅन सुविधा आता MJPJAY योजनेत समाविष्ट करण्यात आली आहे. त्यामुळे रुग्णांवर आर्थिक भार पडणार नाही. याशिवाय 4 फेब्रुवारी 2025 पासून राज्यभर व्यापक कर्करोग तपासणी मोहीम राबविण्यात आली असून आतापर्यंत 3 कोटी 5 लाख नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे. या तपासणीत 41,169 संशयित रुग्ण आढळले असून बायोप्सीनंतर 1,677 रुग्णांना कर्करोगाचे निश्चित निदान झाले आहे. विशेष म्हणजे, यामध्ये 2 कोटी 92 लाख महिलांची स्तन आणि गर्भाशय मुखाच्या कर्करोगासाठी तपासणी करण्यात आली आहे.
कर्करोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी शासन जनजागृती मोहिमा अधिक तीव्र करत असून उपचार व्यवस्था सक्षम करण्यासाठी टाटा हॉस्पिटलसह इतर शासकीय आणि खासगी रुग्णालयांना आवश्यक निधी दिला जात असल्याची माहितीही आरोग्य मंत्र्यांनी दिली. कर्करोगासारख्या गंभीर आजाराच्या पार्श्वभूमीवर लवकर निदान, व्यापक जनजागृती आणि सर्वसामान्यांना परवडणाऱ्या उपचारांची भक्कम व्यवस्था उभारण्यासाठी शासन विविध स्तरांवर काम करत असल्याचे त्यांनी सभागृहात स्पष्ट केले.

