(नाशिक / प्रतिनिधी)
दिवसेंदिवस वाढत जाणारी बेसुमार जंगलतोड.. जागतिक तापमान वाढीचा धोका… पाण्याचे दुर्भिक्ष्य.. वाढते प्रदूषण.. हे दुष्टचक्र संपून पर्यावरण संरक्षण आणि संवर्धन होण्यासाठी अखिल भारतीय श्री स्वामी सेवामार्गाचे प्रमुख परमपूज्य गुरुमाऊली श्री. आण्णासाहेब मोरे यांच्या आशीर्वादाने आणि गुरुपुत्र श्री. नितीनभाऊ मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण देश पातळीवर महावृक्षारोपण आणि संवर्धन अभियान अधिक व्यापक स्तरावर राबवले जात आहे. या अभियानाला आता यश मिळत असून तीन वर्षांपूर्वी लावलेल्या रोपांचे आज ठिकठिकाणी घनदाट झाडी आणि बहारदार वृक्षराजीत रूपांतर झाल्याचे पहावयास मिळत आहे. त्यामुळे पर्यावरणप्रेमींमधून आनंद व्यक्त होत आहे.
श्री स्वामी सेवामार्गाच्या केंद्र सक्षमीकरण अभियानांतर्गत गुरुपुत्र श्री मोरे सध्या मराठवाडा दौऱ्यावर आहेत. जिंतूरमध्ये त्यांचे अपूर्व उत्साहात सेवेकर्यांनी स्वागत केले. श्री मोरे यांच्या उपस्थितीत तीन वर्षांपूर्वी जिंतूर मधील शासकीय जागेत मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात आले होते. त्या ठिकाणी जाऊन श्री मोरे यांनी (३० मे २०२५) पाहणी केली. तेव्हा रस्त्याच्या दुतर्फा आणि मोकळ्या जागांमध्ये डौलाने उभी असलेली बहारदार वृक्षराजी आणि घनदाट झाडी पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले आणि तीन वर्षांपूर्वी लावलेल्या रोपांचे योग्य प्रकारे संवर्धन केल्याबद्दल सेवेकऱ्यांचे कौतुकही केले. परमपूज्य गुरुमाऊलींनी वृक्षारोपण करताना त्यांचे संवर्धन काळजीपूर्वक करा अशी सेवेकऱ्यांना आज्ञा केली होती. ही आज्ञा शिरसावद्य मानून प्रत्येक सेवेकरी रोपांची काळजी घेत होता. या प्रयत्नांना यश येऊन असंख्य रोपांचे मोठ्या वृक्षात रूपांतर झालेले बघावयास मिळते.
वृक्षदिंडी आणि वृक्षारोपण….
जिंतूरमधील सेवेकर्यांनी मोठ्या उत्साहात गुरुपुत्र श्री. नितीनभाऊ मोरे यांच्या उपस्थितीत वाजत-गाजत वृक्षदिंडी काढली. श्री. मोरे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. पर्यावरण रक्षणासाठी सेवामार्ग कटिबद्ध असून यावर्षीही महावृक्षारोपण अभियान आणि सीडबॉल उपक्रम सेवेकर्यांनी यशस्वी करावा असे आवाहन त्यांनी केले. वृक्षदिंडी आणि वृक्षारोपणानंतर श्री. मोरे यांनी सेवाकेंद्रात सेवेकऱ्यांना केंद्र सक्षमीकरणाबाबत मार्गदर्शन केले.