( हैदराबाद )
जागतिक युद्धजन्य परिस्थिती, वाढती महागाई आणि विस्कळीत पुरवठा साखळी यामुळे निर्माण झालेल्या आर्थिक दबावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना इंधन बचत करण्यासह एक वर्ष सोने खरेदी टाळण्याचे आवाहन केले आहे. सिकंदराबाद येथील परेड ग्राऊंडवरील सभेत बोलताना त्यांनी देशाच्या परकीय गंगाजळीवर वाढत्या आयातीचा ताण पडत असल्याची चिंता व्यक्त केली.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, जगभरातील पुरवठा साखळीवर परिणाम झाल्याने अनेक देशांमध्ये इंधनाच्या किमती वाढल्या आहेत. कच्च्या तेलाच्या वाढत्या दरांचा थेट परिणाम सामान्य नागरिकांवर होऊ नये, यासाठी केंद्र सरकार विविध देशांकडून इंधन खरेदीचे पर्याय शोधत असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, दीर्घकालीन उपाय म्हणून पेट्रोल आणि डिझेलवरील अवलंबित्व कमी करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यामागील सरकारचा उद्देशही त्यांनी यावेळी सांगितला. रेल्वेमध्ये डिझेलचा वापर कमी झाला असून आगामी काळात पेट्रोल आणि डिझेलचा वापर आणखी घटेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यामुळे देशाची परकीय गंगाजळी वाचण्यास मोठी मदत होईल, असेही मोदी म्हणाले.
“एक वर्ष सोने खरेदी थांबवा”
देशाच्या आर्थिक आव्हानांवर मात करण्यासाठी जनतेनेही सहभाग नोंदवावा, असे आवाहन करताना पंतप्रधानांनी नागरिकांना एक वर्ष सोने खरेदी टाळण्याचे सुचविले. सण-उत्सव आणि शुभमुहूर्तावर मोठ्या प्रमाणावर होणारी सोने खरेदी कमी झाल्यास सोन्याची आयात घटेल आणि देशाची परकीय गंगाजळी वाढण्यास मदत होईल, असे त्यांनी म्हटले. यावेळी त्यांनी खतांच्या वाढत्या किंमतींचाही उल्लेख केला. अनेक देशांमध्ये युरियाची एक बॅग सुमारे 3 हजार रुपयांना मिळत असताना भारतात केंद्र सरकारच्या अनुदानामुळे ती 300 रुपयांपेक्षा कमी दरात उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
काँग्रेस आणि बीआरएसवर जोरदार टीका
सभेदरम्यान पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेस आणि बीआरएसवरही निशाणा साधला. कुटुंबकेंद्री राजकारण देशाला मान्य नसल्याचे सांगत त्यांनी तेलंगणामध्ये भाजप सत्तेत येईल, असा विश्वास व्यक्त केला. पश्चिम बंगालमध्ये जनतेने एकाधिकारशाही नाकारल्याचा उल्लेख करत तेलंगणातही बदलाची लाट असल्याचा दावा त्यांनी केला. तसेच, तेलंगणासाठी झहीराबाद इंडस्ट्रियल कॉरिडॉर आणि पीएम मित्र टेक्सटाईल्स पार्क मंजूर केल्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली.
फडणवीसांचाही पंतप्रधानांच्या आवाहनाला पाठिंबा
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये माध्यमांशी बोलताना पंतप्रधानांच्या आवाहनाचे समर्थन केले. अमेरिका, इस्राईल आणि इराकमधील संघर्षामुळे जगभरात तेल आणि गॅसची कमतरता निर्माण होत असल्याचे त्यांनी सांगितले. “पाकिस्तानमध्ये पेट्रोलचा दर 450 रुपये प्रतिलिटरपर्यंत पोहोचला आहे. पंतप्रधान मोदी यांच्या प्रयत्नांमुळे भारतात पेट्रोल आणि गॅसचा पुरवठा सुरळीत सुरू आहे. त्यामुळे इंधनाचा वापर गरजेनुसार आणि जपून करणे आवश्यक आहे,” असे फडणवीस यांनी म्हटले.

