तीन वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंड करत भाजपसोबत सत्ता स्थापन केली. त्या बंडानंतर शिवसेना दोन गटात विभागली गेली, एक शिंदे गट आणि दुसरा उद्धव ठाकरे गट. यातून पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्ह ‘धनुष्यबाण’ यावरून निर्माण झालेला वाद निवडणूक आयोगापासून सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचला.
निवडणूक आयोगाने आमदार आणि खासदारांच्या संख्याबळाच्या आधारे धनुष्यबाण चिन्ह आणि ‘शिवसेना’ हे नाव एकनाथ शिंदे गटाला दिले. या निर्णयाला उद्धव ठाकरे यांच्या गटाने आव्हान दिले असून सुप्रीम कोर्टात या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. ठाकरे गटाच्या बाजूने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल तर शिंदे गटाकडून मुकुल रोहतगी युक्तिवाद करत आहेत.
आजच्या सुनावणीत काय घडलं?
आज सोमवार, १४ जुलै रोजी या प्रकरणावर न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमल्ल्या बागची यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. मात्र कोर्टाने आज अंतिम सुनावणी घेण्यास नकार देत ऑगस्टमध्ये सुनावणी घेणार असल्याचे स्पष्ट केले. कपिल सिब्बल यांनी ऑगस्टमध्ये तारखेची मागणी केल्यानंतर, न्यायालयाने पुढील १-२ दिवसांत तारीख निश्चित केली जाईल असे सांगितले.
शिंदे गटाच्या बाजूने युक्तिवाद करताना रोहतगी यांनी ठाकरेंच्या गटावर टीका करत म्हटले की, “दोन वर्षांपासून याचिकेत कोणतीच कारवाई करण्यात आली नाही, आणि आता कोर्टात धाव घेतली आहे.” यावर सुप्रीम कोर्टाने टिप्पणी केली की, “हे प्रकरण गेली दोन वर्षे प्रलंबित आहे, त्यामुळे यावर आता अंतिम निर्णय व्हायला हवा.”
निकाल कधी अपेक्षित?
सुप्रीम कोर्टाने संकेत दिले आहेत की, ऑगस्टमध्ये अंतिम सुनावणी झाल्यास पुढील तीन महिन्यांत निकाल देण्यात येऊ शकतो. दरम्यान, मुंबई महानगरपालिका निवडणूक जाहीर झाल्यास कोर्ट निर्णय राखून ठेवू शकते. मात्र, २०२५ च्या अखेरीस या प्रकरणाचा निकाल येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पक्ष आणि चिन्ह कुणाच्या हातात?
धनुष्यबाण चिन्ह आणि ‘शिवसेना’ हे पक्षाचे नाव कायम शिंदे गटाकडेच राहणार की ठाकरे गटाकडे परत जाणार, यावर सर्वांचे लक्ष लागून आहे. कारण या निकालावर शिवसेनेच्या दोन्ही गटांचे राजकीय भवितव्य आणि स्थानिक तसेच आगामी विधानसभा निवडणुकीतील स्थान ठरणार आहे.