(पुणे)
मोक्का अंतर्गत कारावास भोगत असलेल्या कुख्यात गुंड गजा मारणे याच्या ‘मटण पार्टी’ने पुणे पोलिस दलाची चांगलीच गोची केली आहे. गजाला सांगली कारागृहात हलवताना पोलिसांच्या देखत ढाब्यावर थांबून त्याला मटण खाऊ घालण्यात आल्याचा प्रकार समोर आला असून, याप्रकरणी एक सहाय्यक पोलिस निरीक्षक व चार कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
गजा मारणे याला येरवडा कारागृहातून सांगलीला हलवताना पोलिस व्हॅन साताऱ्यातील एका ढाब्यावर थांबली. पोलिस कर्मचारी जेवण घेत असतानाच, गजाच्या टोळीतील गुंडांनी ढाब्यावरून मटणाची थाळी आणून थेट व्हॅनमध्ये बसलेल्या मारणेला दिली. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून, यामुळे पुणे पोलिस दलावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.
या धक्कादायक प्रकाराची माहिती मिळताच पुणे पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी तात्काळ चौकशीचे आदेश दिले. गुन्हे शाखेने सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने तपासणी केली आणि गजा मारणेची ‘ढाबा मटण पार्टी’ सत्य ठरली. या प्रकरणी सहाय्यक पोलिस निरीक्षक सूरज राजगुरु, हवालदार महेश बामगुडे, हवालदार सचिन मेमाणे, हवालदार रमेश मेमाणे आणि पोलीस शिपाई राहुल परदेशी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
तसेच, गजाला ढाब्यावर भेटून त्याला मटण पुरवणाऱ्या सतीश शिळीमकर, विशाल धुमाळ, आणि बाळकृष्ण उर्फ पांड्या मोहिते या तिघांविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सह पोलिस आयुक्त रंजन कुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.