(संगमेश्वर / एजाज पटेल)
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर लाखो भक्त कोकणात दाखल होत असताना आरवली–संगमेश्वर ते बावनदी महामार्ग खड्ड्यांचा महासापळा झाला आहे. त्यामुळे प्रवाशांना अक्षरशः जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असून, महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी दिलेली आश्वासने हवेत विरल्याने जनतेतून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
काही दिवसांपूर्वी या रस्त्याच्या दुरवस्थेविरोधात संगमेश्वर सोनवी पुलाजवळ उपोषण छेडण्यात आले होते. त्यावेळी महामार्ग अभियंता अनामिका जाधव आणि अधिक्षक अभियंता कुलकर्णी यांनी ठेकेदार कंपनीला फटकारले होते. तसेच खड्डे बुजवणे, डांबरीकरण करणे, गौण खनिज भरलेल्या वाहनांवर नियंत्रण ठेवणे यांसह सर्व कामे गणेशोत्सवापूर्वी मार्गी लावण्याचे लेखी आश्वासन उपोषणकर्त्यांना दिले होते. मात्र प्रत्यक्षात हे आश्वासन पाळले गेले नाही.
सध्या रस्त्यावर केवळ वरवर खडी टाकून तात्पुरता तोडगा काढला जात असल्याने खड्डे पुन्हा दिसू लागले आले आहेत. परिणामी, वाहनधारकांना सावकाश गतीने प्रवास करावा लागत असून, त्यातून वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. यासाठी पोलिसांना वाहतूक सुरळीत करण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
याशिवाय महामार्गावरून गौण खनिजाने भरलेली अवजड वाहने बेफिकीरपणे धावू लागल्याने अपघाताचा धोका आणखीनच वाढला आहे. आधीच या रस्त्याच्या दुर्दशेमुळे अनेक जीव गेलेले आणि शेकडो जण जखमी झालेले असताना, गणेशभक्तांना पुन्हा जीवावर उदार होऊन प्रवास करावा लागतो, ही संतापजनक बाब असल्याची चर्चा जनतेत सुरू आहे.
महामार्गाचे अधिकारी आणि ठेकेदार यांच्यातील मिलीभगत याबाबत जनतेमध्ये रोष असून, गणेशोत्सवाच्या निमित्ताने जनतेच्या सुरक्षिततेपेक्षा ठेकेदारांचे हित जपले जात आहे, अशी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.

