(संगमेश्वर/ प्रतिनिधी)
संगमेश्वर तालुक्यातील तुरळ–धामापूर–करजुर्वे हा महत्त्वाचा दळणवळणाचा मार्ग गेल्या वर्षभरापासून अत्यंत दयनीय अवस्थेत असून, या रस्त्याने आता अक्षरशः ‘मृत्यूचा सापळा’ धारण केला आहे. वारंवार तक्रारी, निवेदने आणि आंदोलनाचे इशारे देऊनही देवरूख सार्वजनिक बांधकाम विभागाने या प्रश्नाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप करत पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी आता उग्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.
गेल्या सहा महिन्यांत या रस्त्यावर १० ते १२ लहान-मोठे अपघात घडल्याची नोंद असून, रस्त्यावरील प्रचंड खड्ड्यांमुळे एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना संताप वाढवणारी ठरली आहे. रस्त्याची अवस्था इतकी बिकट झाली आहे की दुचाकीस्वारांनाच नव्हे, तर पायदळ चालणाऱ्यांनाही जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. स्थानिकांनी वेळोवेळी संबंधित अधिकाऱ्यांना रस्त्याच्या दुरवस्थेबाबत अवगत केले. निवेदने सादर केली, आंदोलनाचे इशारे दिले; मात्र प्रशासनाकडून केवळ आश्वासनांचीच पुनरावृत्ती होत असल्याने ग्रामस्थांच्या संयमाचा बांध फुटला आहे. ना डांबरीकरण, ना खड्डे भरण्याची तात्पुरती उपाययोजना अशी स्थिती कायम आहे.
या पार्श्वभूमीवर तुरळचे माजी सरपंच अरविंद जाधव यांनी प्रशासनावर तीव्र शब्दांत टीका करत इशारा दिला. “गेल्या वर्षभरापासून आम्ही सातत्याने पाठपुरावा करत आहोत. एका निष्पाप महिलेचा बळी जाऊनही प्रशासनाला जाग येत नसेल, तर ही अत्यंत गंभीर बाब आहे. केवळ आश्वासनांवर आमची बोळवण होणार नाही. तातडीने रस्त्याचे डांबरीकरण किंवा खड्डे भरण्याचे काम सुरू झाले नाही, तर संपूर्ण पंचक्रोशीतील ग्रामस्थ रस्त्यावर उतरतील आणि उग्र आंदोलनासह उपोषण छेडतील. त्यानंतर उद्भवणाऱ्या परिस्थितीस प्रशासन जबाबदार राहील,” असा थेट इशारा त्यांनी दिला आहे.
रस्त्याचे तात्काळ डांबरीकरण करण्यात यावे, धोकादायक वळणांवर तातडीने दुरुस्ती करून अपघात रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात, कामात हलगर्जीपणा करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात यावी, अशा महत्वाच्या मागण्या तुरळ–धामापूर–करजुर्वे मार्गाच्या दुरुस्तीसाठी ग्रामस्थांनी मांडल्या आहेत. दरम्यान, वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर या मार्गाची तातडीने दुरुस्ती न झाल्यास व्यापक जनआंदोलन भडकण्याची चिन्हे दिसत असून, प्रशासनाने वेळीच हस्तक्षेप करण्याची गरज अधोरेखित होत आहे.

