( संगमेश्वर / प्रतिनिधी )
कुणबी सेवा संघ, दापोली संचलित पूज्य सामंत गुरूजी कन्या छात्रालयाचा सुवर्णमहोत्सवी कार्यक्रम आणि नवभारत छात्रालय आणि पूज्य सामंत गुरूजी कन्या छात्रालयाच्या आजी-माजी विद्यार्थी-विद्यार्थिनींचा स्नेहमेळावा रविवार, दि. १० मे २०२६ रोजी दापोली येथे सेवाव्रती शिंदे गुरूजी सभागृहात अत्यंत उत्साहपूर्ण व भावनापूर्ण वातावरणात संपन्न झाला. याप्रसंगी व्यासपीठावर कुणबी सेवा संघाचे अध्यक्ष प्रभाकर शिंदे हे कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. लेखक, पत्रकार आणि पैसा फंड हायस्कूल, संगमेश्वरचे कला शिक्षक जितेंद्र पराडकर हे प्रमुख पाहुणे तर रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. अस्मिता केंद्रे या विशेष अतिथी म्हणून उपस्थित होत्या. त्याचप्रमाणे दापोली तालुक्याचे माजी आमदार डॉ. चंद्रकांत मोकल, कुणबी सेवा संघ, दापोलीचे उपाध्यक्ष डॉ. प्रमोद सावंत, पूज्य सामंत गुरूजी कन्या छात्रालयाच्या व्यवस्था कमिटी अध्यक्षा डॉ. विद्या दिवाण, सदस्य डॉ. अशोककुमार निर्बाण, सचिव श्री. हरिश्चंद्र कोकमकर, विद्यार्थी प्रतिनिधी सदाशिव चव्हाण, विद्यार्थिनी प्रतिनिधी सौ. आशा घायले हे उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात गुरुद्वयांच्या समाधीस वंदन व दीपपूजन करून करण्यात आली. त्यानंतर “खरा तो एकची धर्म” या कन्या छात्रालयाच्या विद्यार्थिनीनी गायलेल्या आशयपूर्ण प्रार्थनेने झाली. या प्रसंगी प्रा. प्रभाकर शिंदे यांनी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जितेंद्र पराडकर, तर डॉ. विद्या दिवाण यांनी विशेष अतिथी मा. सौ. अस्मिता केंद्रे यांचे शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन स्वागत आणि सत्कार केला.
डॉ. विद्या दिवाण यांनी त्यांच्या प्रास्ताविकातून कन्या छात्रालयाच्या सुवर्णमहोत्सवाचे ऐतिहासिक महत्व अधोरेखित करत, दोन्ही छात्रालयांच्या आजी-माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहमेळाव्याच्या माध्यमातून संस्थेची परंपरा, संस्कार आणि विविध पिढयांमधील अधिक दृढ होत असल्याचे नमूद केले. यावेळी डॉ. प्रमोद सावंत यांनी संस्थेच्या वाटचालीचा सर्वसमावेशक आढावा सादर केला. कुणबी सेवा संघाच्या शैक्षणिक, सामाजिक, कृषि व समाजोन्नतीच्या विविध उपक्रमांचा उल्लेख करत संस्थेने बजावलेल्या महत्वपूर्ण भूमिकेवर त्यांनी प्रकाश टाकला.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जितेंद्र पराडकर यांनी आपल्या मनोगतात कुणबी सेवा संघाच्या शैक्षणिक, सामाजिक आणि विकासाभिमुख कार्याचे विशेष कौतुक केले. संस्था अत्यंत शिस्तबध्द, पारदर्शक, प्रामाणिक आणि जिद्दीने विविध उपक्रम राबवत असून, त्यामागे संस्थेतील कर्मचारी वर्गाचे निःस्वार्थी, उत्साही आणि समर्पित योगदान असल्याचे त्यांनी नमूद केले. संस्थेच्या प्रगतीसाठी आजी – माजी विद्यार्थिनींनीही खारीचा वाटा उचलत यथाशक्ती आर्थिक योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. छोटया छोटया देगण्यांतूनही मोठे आणि परिणामकारक उपक्रम उभे राहू शकतात, असा स्वतःचा अनुभव त्यांनी सांगितला. संस्थेच्या कार्यामागे अधिक ताकदीने उभे राहण्याचे आवाहन करताना त्यांनी विद्यार्थिनींना निरीक्षणशील बनण्याचा, भरपूर वाचन करण्याचा आणि सातत्याने लेखन करण्याचा प्रेरणादायी संदेश दिला. संस्थेने जो माझा सन्मान केला त्याबद्दल मी संस्थेचा ऋणी आहे, असेही नमूद केले.
कार्यक्रमाच्या विशेष अतिथ सौ. अस्मिता केंद्रे यांनी आपल्या मनोगतात पूज्य सामंत गुरुजी कन्या छात्रालयाशी असलेल्या जिव्हाळ्याच्या नात्याला उजाळा देताना, ‘मी या छात्रालयाची माजी विद्यार्थिनी आहे, याचा मला सार्थ अभिमान आहे,’ असे भावपूर्ण उद्गार काढले. छात्रालयातील वास्तव्यात शिस्त, प्रगल्भता, सहनशक्ती, वक्तृत्व यांसारखे जीवनमूल्यांचे धडे मिळाल्याचे त्यांनी सांगितले. येथे मिळालेल्या शेतीविषयक संस्कारांचा आणि अनुभवांचा पुढील प्रत्यक्ष जीवनात मोठा उपयोग झाल्याचे त्यांनी नमूद केले, समाज कल्याण विभागात कार्यरत असताना छात्रालयासाठी काम करण्याची संधी लाभल्याचा विशेष आनंद व्यक्त करत, या छात्रालयाचे ऋण आयुष्यभर मान्य ठेवणेच आपल्यासाठी गौरवाची बाब असल्याची कृतज्ञ भावना त्यांनी व्यक्त केली.
अध्यक्षीय भाषणात प्रभाकर शिंदे यांनी पूज्य सामंत गुरुजी कन्या छात्रालयाच्या स्थापनेमागील सेवाव्रती पांडुरंग शिंदे गुरुजींची दूरदृष्टी आणि धाडस यांचा विशेष गौरव केला. सुमारे ५० वर्षापूर्वी मुलीच्या शिक्षणासाठी स्वतंत्र छात्रालय उभारण्याचा निर्णय त्या काळात अत्यंत क्रांतिकारी होता, कारण त्यावेळी मुलींना शिक्षणाच्या अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता, असे त्यांनी नमूद केले. प्रारंभी पुरेशा सुविधा नसतानाही अनेक विद्यार्थिनींनी येथे राहून शिक्षण पूर्ण केले. त्यांचे योगदान आणि जिद्द प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले. पुढील काळात छात्रालयात आवश्यक सोयीसुविधा उभारण्यात आल्या तसेच मंजूर क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थिनींना प्रवेश देवून त्यांच्या शिक्षणात कोणताही अडथळा येवू दिला नाही, अतिरिक्त खर्चही संस्थेने जबाबदारीने उचलला, असे त्यांनी स्पष्ट केले. सध्याच्या काळात छात्रालये चालविताना अनेक अडचणी येत असल्या तरी त्या सर्वांवर मात करत नवभारत छात्रालय आणि पूज्य सामंत गुरुजी कन्या छात्रालय ही दोन्ही छात्रालये सातत्याने सुरू ठेवण्याचा संस्थेचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. कन्या छात्रालयाच्या ५० वर्षांच्या यशस्वी वाटचालीत सर्व अधीक्षिका, अधीक्षक यांचे मोलाचे योगदान असल्याचे नमूद करून, त्यांच्या सहकार्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. तसेच संस्थेच्या प्रगतीत पदाधिका यांचे आणि कार्यकर्त्याचे योगदान असल्याने ही प्रगती साध्य झाल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.
याप्रसंगी छात्रालयाच्या जडणघडणीत मोलाची भूमिका बजावणाऱ्या आजी माजी अधीक्षिका श्रीमती गितांजली जोशी, सौ. शर्वरी कोकमकर, सौ. वर्षा गोरिवले, श्रीमती सुमती भुवड, सौ. शालीनी कोकमकर, श्रीमती शिल्पा गीते आणि सौ. अनुपमा तोडणकर यांचा सन्मान करण्यात आला. त्यांच्या मार्गदर्शनाने, शिस्तप्रियतेने आणि सेवाभावाने अनेक विद्यार्थिनींचे जीवन घडविले याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत त्यांना शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. तसेच संस्थेच्या कार्यात उल्लेखनीय योगदान देणारे हरिश्चंद्र कोकमकर आणि राजेंद्र शिंदे यांचाही शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन विशेष सत्कार करण्यात आला. स्वतःच्या जबाबदाऱ्या समर्थपणे सांभाळत कन्या छात्रालयाची जडणघडण आणि प्रगतीत त्यांनी दिलेल्या योगदानाचा हा गौरव होता. सुवर्ण महोत्सवानिमित्त सौ आशा घायले यांनी संस्थेला एक लाख रूपयांची देणगी देऊन छात्रालयाविषयी आपली कृतज्ञता व्यक्त केली, त्याबद्दल संस्थेतर्फे त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
सत्कारमूर्तीच्या वतीने विद्यामान अधीक्षिका सौ. वर्षा गोरीवले यांनी मनोगत व्यक्त केले. गेली तब्बल २५ वर्षे छात्रालयाशी घट्ट नाते जपताना २००८ पासून अधीक्षिका म्हणून आणि त्यापूर्वी विद्यार्थिनी म्हणून लाभलेल्या अनुभवांना उजाळा देत त्यानी छात्रालयाने दिलेले संस्कार, शिस्त, आत्मीयता आणि जीवनाला मिळलेली दिशा याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. छात्रालय हे केवळ निवासस्थान नसून अनेक मुलींच्या आयुष्याला आकार देणारे संस्कार केंद्र असल्याचे त्यांनी भावपूर्ण शब्दात सांगितले.
या सुवर्णमहोत्सवी कार्यक्रमानिमित्त प्रकाशित करण्यात आलेल्या “सुवर्णवेल” या स्मरणिकेचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. कन्या छात्रालयाच्या पन्नास वर्षाच्या प्रेरणादायी प्रवासाचे, माजी विद्यार्थिनींच्या आठवणींचे आणि संस्थेच्या जडणघडणीतील कार्यकर्त्याच्या योगदानाचे दस्ताऐवजी करणारी ही स्मरणिका विशेष आकर्षण ठरली. याच कार्यक्रमाचे औचित्य साधून संस्थेच्या www.kssdapoli.com या वेबसाईटचे अनावरण कार्यक्रमाच्या विशेष अतिथी सौ. अस्मिता केंद्रे यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमात माजी विद्यार्थी श्रीकृष्ण खांडेकर, योगेश नांगले आणि विद्यार्थिनी सौ. आशा घायले, सौ. वैशाली गावडे यांनी आपल्या छात्रालयातील आठवणींना उजाळा देत भावनिक मनोगते व्यक्त केली. छात्रालयाने दिलेले संस्कार, शिक्षणाची प्रेरणा, आत्मविश्वास आणि आयुष्याला मिळालेली दिशा याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.कार्यकमाचे सूत्रसंचालन प्रभाकर तेरेकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन माजी विद्यार्थीनी सो. निशा सावंत हिने केले. कार्यक्रमाची सांगता पसायदानाने झाली.
या कार्यक्रमाला समाजाच्या विविध घटकातील प्रतिष्ठीत मंडळी, नागरिक, पालक, दोन्ही छात्रालयांचे आजी-माजी विद्यार्थी-विद्यार्थिनी, संघाचे सर्व पदाधिकारी, सदस्य मोठया संख्येने उपस्थित होते.हा सुवर्ण महोत्सव आणि स्नेहमेळावा केवळ एक उत्सव नव्हता, तर पन्नास वर्षांचया समर्पित सेवाभाव, संस्कारमय शिक्षण आणि समाजोन्नतीच्या उज्ज्वल परंपरेचा गौरव करणारा ऐतिहासिक सोहळा ठरला.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कुणबी सेवा संघाचे अध्यक्ष प्रा. प्रभाकर शिंदे यांच्या नेतृत्वाखाली खजिनदार प्रदीप इप्ते, सचिव हरिश्चंद्र कोकमकर, कन्या छात्रालयाच्या अधीक्षिका सौ. वर्षा गोरिवले यांनी विशेष मेहनत घेतली. त्यांना मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र शिंदे, रवींद्र गोरीवले, नवभारत छात्रालयाचे अधिक्षक सुनिल ठाकूर, कर्मचारी सुजित गोलांबडे, समिर शिबे, कमलाकर मुलूख, प्रदीप मुलूख, प्रेम पागडे, सौ. रेणुका शिंदे, सौ. कोमल जावकर, सौ. वैशाली कोकमकर, सौ. स्नेहल पवार यांनी विशेष सहकार्य केले.

