(संगमेश्वर / एजाज पटेल)
महामार्ग प्राधिकरणाने गर्डर बसविण्याची तयारी दर्शवून, 13 नोव्हेंबर ते 16 नोव्हेंबर पर्यंत वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करावा, असे मार्गदर्शक फलक जागोजागी लावले. लिहून ठेवलेल्या तारखेला काम काही सुरु झाले नाही. काही ठिकाणी लावण्यात आलेले सूचना व मार्गफलक तसेच ठेवल्याने वा काही कारणास्तव काम सुरु होणार नसल्याच्या सूचना न दिल्याने वाहन चालकांना राष्ट्रीय महामार्गावरून अंतर्गत जाणाऱ्या पर्यायी मार्गाचा वापर करत खाच खळग्यातून प्रवास करावा लागला. तसेच नाहक वेळ आणि अधिक इंधनभाराचा फटकाही सहन करावा लागला. या प्रकाराने आधीच त्रस्त आणि संभ्रमात पडलेली जनसामान्य जनता तसेच वाहनचालक आता आणखी त्रस्त झाले आहेत.
सोमवारी 17 तारखेला गर्डर बसवण्याच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली. रात्रीपासून पहाटे पर्यंत काम सुरू करण्यात येणार असल्याचे कार्यकारी अभियंता यांनी स्पष्ट केले होते. पण हे काम सुरू करताना कोणत्या परवानगीची आवश्यकता भासली होती काय? की तुम्हीच तुमच्या स्तरावर योग्य वाटले म्हणून ही वेळ ठरवली? जर यापुर्वी सकाळी १० ते दुपारी १ नंतर दुपारी ३ ते सायंकाळी ५ व रात्री १० ते ३ ही वेळ ठरवण्यात आली होती. मग त्यात बदल केला, तो कोणाच्या आदेशानुसार? हा प्रश्न अजूनही अनुत्तरित असून जनसामान्यांच्या या प्रश्नावर महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनीही मौन बाळगले आहे.
सोमवारी रात्री संगमेश्वर एसटी स्टॅंड समोर गर्डर बसवण्याच्या कामाला सुरवात करणार म्हणून संगमेश्वर पोलिसांची फौज अगदी महामार्गावरील बावननदी पासून आंबेड शास्त्रीपूल पर्यंत तैनात केली होती. वाहतूक सुरळीत रहावी व काही अनर्थ घडू नये यासाठी अतिरिक्त पोलिसांची टीम उपस्थित होती. रात्री अकरा ते पहाटे तीन वाजेपर्यंत गर्डर बसवण्याचे काम केले जाणार असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ नये, पर्यायी मार्गाने वाहतूक सुरळीत करण्याच्या सूचना वरिष्ठांकडून आपल्याला मिळाले असल्याचे संगमेश्वर पोलीस निरीक्षक राजाराम चव्हाण यांनी पत्रकारांना माहिती देताना सांगितले.
सोमवारी गर्डर बसवण्याच्या कामाच्या ठिकाणी सबंधित विभागाचे अभियंता कुलकर्णी हे प्रत्यक्षात उपस्थित होते. जिल्हाधिकारी यांच्याकडून गर्डर चे काम करत असताना महामार्गावरील वाहन वाहतूक थांबवण्याची परवानगी लागते का? व तशी परवानगी लेखी स्वरूपात घेतली आहे का? असे विचारले असता त्यांच्याकडून संभ्रम निर्माण होईल अशी उत्तरे मिळाली. त्यामुळे हा सर्व प्रकार आलबेल असा असून जनतेला वेठीस धरून ठेकेदाराला आशीर्वाद देण्याचा प्रकार आहे की काय? अशी चर्चा सुरु होती. लवकरच याबाबत जागरूक नागरिक केंद्रीय बांधकाम मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन वस्तुस्थिती कथन करणार असल्याच्या तयारीत असल्याचे समजते.

