(देवळे / प्रकाश चाळके)
संगमेश्वर तालुक्यातील देवळे येथे श्री देवी कालेश्वरी मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाली. तीन दिवस चाललेल्या या धार्मिक सोहळ्याला पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
दि. ६ मे रोजी वाणीवाडी ते देवळे बाजारपेठ येथील कालेश्वरी मंदिरापर्यंत भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते.
सायंकाळी ४.३० ते ६.३० या वेळेत निघालेल्या या मिरवणुकीत ढोल-ताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी, लाठी-काठी पथकांचे सादरीकरण, गुलालांची उधळण आणि भगव्या निशाण्यांनी परिसर दुमदुमून गेला होता. भगवे व पांढरे पारंपरिक पोशाख परिधान करून महिला, पुरुष, युवक तसेच अबालवृद्ध मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
उडपी येथून आणण्यात आलेली श्री देवी कालेश्वरीची सुबक मूर्ती प्रथम वाणीवाडी येथे ठेवण्यात आली होती. त्यानंतर अत्यंत भक्तिमय वातावरणात ही मूर्ती मिरवणुकीद्वारे मंदिरात आणण्यात आली. या सोहळ्यास सुमारे चार हजार भाविक उपस्थित होते. संपूर्ण देवळे गावाला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते.
दि. ७ मे रोजी विविध धार्मिक पूजा-अर्चा आणि विधी पार पडले. तर दि. ८ मे रोजी वेदमंत्रांच्या गजरात होमहवन आणि अन्य धार्मिक विधींसह श्री देवी कालेश्वरीची प्राणप्रतिष्ठापना विधिवत संपन्न झाली. यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
तीन दिवस चाललेल्या या उत्सवात भाविकांसाठी अरुण गुरव आणि रवी गुरव यांनी मोफत लिंबू सरबत वाटपाची सेवा केली. तसेच देवळे येथील प्रसिद्ध व्यापारी देवेंद्र वळामे यांनी श्री देवी कालेश्वरी चरणी आंब्याचा नैवेद्य अर्पण केला.
देवळे येथे भव्य मंदिर उभारण्याची ग्रामस्थांची अनेक वर्षांची इच्छा होती. मात्र पुढाकार कोण घेणार, हा प्रश्न कायम होता. अखेर गावातील गजानन काळोखे यांच्या पुढाकाराने अठरा मानकरी आणि संपूर्ण ग्रामस्थ एकत्र आले. सर्वांच्या सहकार्याने मंदिर उभारणीची संकल्पना प्रत्यक्षात उतरली. आज दिमाखदार मंदिरात देवीची आकर्षक आणि सुबक मूर्ती स्थापित झाल्याने देवळे आणि पंचक्रोशीतील भाविकांमध्ये समाधान आणि आनंदाचे वातावरण आहे.

