(संगमेश्वर / एजाज पटेल)
शांतताप्रिय समजल्या जाणाऱ्या संगमेश्वर तालुक्यातील कडवई बाजारपेठेत रविवारी सकाळी दहशतीचा नंगानाच घालणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळण्यात संगमेश्वर पोलिसांनी यश आले आहे. भरवस्तीत तलवार आणि लोखंडी रॉडने धुमाकूळ घालणाऱ्या मुख्य आरोपीसह त्याच्या पत्नीलाही पोलिसांनी जेरबंद केल्याने या प्रकरणाला आता वेगळे वळण लागले आहे. न्यायालयाने या तिन्ही आरोपींना २४ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून, या कारवाईमुळे मोठी खळबळ उडाली आहे.
भरवस्तीत तलवारीचा धाक आणि तोडफोड
रविवारी सकाळी ९:३० च्या सुमारास ही थरारक घटना घडली. संशयित आरोपी सुरेश दाजी इंजळे (रा. ओकटेवाडी) याने आपल्या साथीदारांसह कडवई बाजारपेठेत प्रवेश केला. फरिदा कमाल वागले यांच्या घरासमोर उभ्या असलेल्या एका आलिशान होंडा सिटी कारवर (क्र. MH-02-AY-8602) या टोळीने आपला मोर्चा वळवला. “ही गाडी हर्षद मोडक यांचीच आहे का? अशी खात्री करून घेतल्यानंतर आरोपीने हातात असलेल्या नंग्या तलवारीने आणि लोखंडी रॉडने गाडीवर भीषण प्रहार करण्यास सुरुवात केली. काही क्षणांतच गाडीच्या काचा फोडून आणि चक्काचूर करून मोठ्या प्रमाणावर नुकसान करण्यात आले. यावेळी मध्यस्थी करणाऱ्या एका ६४ वर्षीय वृद्ध महिलेलाही धमकी देऊन या टोळीने परिसरात दहशत निर्माण केली होती.
तपासात धक्कादायक खुलासा, पत्नीचाही सहभाग
घटनेचे गांभीर्य ओळखून संगमेश्वर पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली. या गुन्ह्यात सुरुवातीला केवळ सुरेश इंजळे याचे नाव समोर आले होते, मात्र पोलीस हवालदार एस. एस. जाधव आणि त्यांच्या पथकाने केलेल्या सखोल चौकशीत एक धक्कादायक माहिती उघड झाली. या संपूर्ण राड्यात आणि नियोजनात मुख्य आरोपीची पत्नी स्नेहल सुरेश इंजळे ही देखील सक्रिय सहभागी असल्याचे निष्पन्न झाले. एका गुन्हेगारी कृत्यात पतीसोबत पत्नीचाही असा सहभाग आढळल्याने संपूर्ण तालुक्यात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पोलिसांनी सुरेश इंजळे, त्याची पत्नी स्नेहल आणि त्यांचा साथीदार रोशन लक्ष्मण ओकटे या तिघांनाही शिताफीने अटक केली आहे.
पोलीस कोठडीत आरोपींच्या ‘कबुली’कडे सर्वांचे लक्ष
न्यायालयाने या तिन्ही आरोपींची रवानगी २४ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत केली आहे. या कोठडी दरम्यान पोलीस या टोळीची कसून चौकशी करणार आहेत. या तोडफोडीमागचा मुख्य सूत्रधार कोण आहे? हा हल्ला वैयक्तिक वादातून झाला की यामागे काही मोठे षडयंत्र आहे? तसेच, आरोपींच्या तोंडातून या गुन्ह्याबाबत आणखी कोणते धक्कादायक खुलासे बाहेर पडतात, याकडे आता संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.

