(संगमेश्वर / प्रतिनिधी)
पावसाळा सुरू झाला की साप-नाग घरात घुसण्याच्या घटना कोकणात नेहमीच घडतात, मात्र चिखली (बौद्धवाडी) येथे थेट आठ फूट लांब अजगर शिरल्याने परिसरात खळबळ उडाली. विकास मोहिते यांच्या घरात घुसलेल्या या अजगराला स्थानिक सर्पमित्र अक्षय मोहिते व त्यांच्या सहकाऱ्यांनी जीव धोक्यात घालून सुरक्षितरीत्या पकडले व नैसर्गिक अधिवासात सोडले.
ही घटना रविवारी सकाळी घडली. अजगराने घरातील एक कोंबडी गिळंकृत केली होती. दुसऱ्या कोंबडीकडे झेप घेत असतानाच विकास मोहिते यांच्या लक्षात हे प्रकरण आले. त्यांनी तातडीने सर्पमित्र अक्षय मोहिते यांच्याशी संपर्क साधला. अक्षय मोहिते आणि त्यांचे सहकारी सम्यक पवार यांनी प्रसंगावधान राखत अजगराला पकडण्याची धाडसी मोहीम राबवली. आजूबाजूच्या नागरिकांनीही मोठ्या उत्सुकतेने ही कारवाई पाहिली. काही वेळातच अजगराला सुरक्षितरीत्या पकडून जंगलात सोडण्यात आले.
सर्पमित्रांनी वेळेवर दाखवलेल्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. परिसरातील नागरिकांनी अक्षय मोहिते आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे अभिनंदन करत त्यांच्या कार्याची प्रशंसा केली.