(मुंबई)
राज्य निवडणूक आयोगाच्या एका निर्णयामुळे राजकीय वर्तुळात नवा वाद निर्माण झाला आहे. आज 15 जानेवारी रोजी होणाऱ्या पालिका निवडणुकीदरम्यान मतदान प्रक्रियेत ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड झाल्यास ‘PADU’ (Printing Auxiliary Display Unit) मशीन वापरण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. मात्र या निर्णयावरून विरोधकांनी आक्षेप घेतला असून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी थेट राज्य निवडणूक आयोगावर सवाल उपस्थित केला आहे.
PADU मशीनच्या वापराबाबत आधी माहिती का देण्यात आली नाही, असा प्रश्न उपस्थित करत राज ठाकरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. मुंबई महापालिका निवडणुकीत ईव्हीएमला जोडले जाणारे हे नवे मशीन राजकीय पक्षांना वेळेआधी दाखवण्यात का आले नाही, असा सवाल त्यांनी केला. “नवीन मशीन असूनही राजकारण्यांना ते दाखवावंसं वाटलं नाही. यात गडबड होणार नाही, याची खात्री कशावरून?” अशी शंका त्यांनी व्यक्त केली. राज्यात सध्या बेबंदशाही सुरू असल्याचा आरोपही राज ठाकरे यांनी केला आहे. तसेच या विषयावर उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिल्याची माहितीही त्यांनी दिली.
PADU मशीनवरून विरोधकांनी आक्षेप घेतल्यानंतर सत्ताधारी भाजपनेही प्रत्युत्तर दिले आहे. भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी विरोधकांवर टीका करत “ही पराभवापूर्वीची तयारी आहे,” असा टोला लगावला. राज आणि उद्धव ठाकरे यांच्यावरही त्यांनी टीकास्त्र सोडले.
PADU मशीनचा वापर कधी आणि कसा होणार?
राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) निर्मित ईव्हीएमचा वापर केला जाणार आहे. मतमोजणीदरम्यान कंट्रोल युनिट (CU) आणि बॅलेट युनिट (BU) जोडूनच मोजणी केली जाणार असून, केवळ तांत्रिक अडचण आल्यास अत्यंत अपवादात्मक परिस्थितीतच PADU मशीनचा वापर केला जाईल.
ही BELची ‘M3A’ प्रकारची मतदान यंत्रे असून ती केवळ बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकांसाठी वापरण्यात येत आहेत. PADU मशीनचा सरसकट वापर होणार नसून, तांत्रिक बिघाड झाल्यासच आणि तोही कंपनीच्या तंत्रज्ञांच्या उपस्थितीत वापरण्याचे स्पष्ट आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत.
बृहन्मुंबई महानगरपालिकेसाठी एकूण 140 PADU मशीन उपलब्ध करून देण्यात आली आहेत. तसेच या मशीनच्या वापराबाबत राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना प्रात्यक्षिक दाखवण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगाने दिले होते. त्यानुसार महापालिकेच्या वतीने सर्व पक्षांच्या प्रतिनिधींना PADU मशीनचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आल्याचे आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
PADU मशीनच्या निर्णयावरून सध्या राजकीय वातावरण तापले असून येत्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा मुद्दा आणखी गाजण्याची शक्यता आहे.

