(मुंबई)
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या सर्वसाधारण बदल्यांना मुदतवाढ देणारा अध्यादेश जारी होण्यापूर्वीच सार्वजनिक बांधकाम विभागाने मोठ्या प्रमाणावर बदल्या केल्या आहेत. विभागाने 32 कार्यकारी अभियंते आणि 198 उपविभागीय अभियंत्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले असून, अलीकडील काळातील हा सर्वात मोठा बदली फेरबदल मानला जात आहे. विशेष म्हणजे अनेक वर्षांपासून मुंबईत कार्यरत असलेल्या काही अभियंत्यांनी पुन्हा मुंबईतच बदली मिळवण्यात यश मिळवल्याने विभागात चर्चा रंगली आहे.
मुंबई, ठाणे आणि महाडमध्ये प्रमुख बदल्या
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उत्तर मुंबई-अंधेरी विभागाचे कार्यकारी अभियंता सचिन धात्रक यांची बदली ठाणे सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक 2 येथे करण्यात आली आहे. त्यांच्या जागी आरे-गोरेगाव विशेष प्रकल्प विभागाच्या कार्यकारी अभियंता गुंजन दिघावकर यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच मुंबईतील एकात्मिक घटक विभागाचे कार्यकारी अभियंता भूषण फेगडे यांची बदली विशेष प्रकल्प विभाग, आरे-गोरेगाव येथे करण्यात आली आहे. ठाणे क्रमांक 2 चे कार्यकारी अभियंता सत्यनारायण कांबळे यांची बदली महाड येथे करण्यात आली आहे.
राज्यभरातील विविध विभागांमध्ये मोठा फेरबदल
या बदल्यांमध्ये राज्यातील विविध प्रादेशिक विभागांतील उपविभागीय अभियंत्यांचा समावेश आहे. त्यानुसार:
- विभागांतर्गत कार्यरत अभियंते – 17
- अमरावती प्रादेशिक विभाग – 18
- छत्रपती संभाजीनगर विभाग – 15
- कोकण विभाग-1 – 27
- कोकण विभाग-2 – 22
- नाशिक विभाग – 25
- पुणे विभाग – 35
- संकल्पचित्र मंडळ – 11
- पंतप्रधान ग्रामसडक योजना कार्यालय – 13
- राष्ट्रीय महामार्ग विभाग – 13
अशा एकूण 198 उपविभागीय अभियंत्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
जे. जे. रुग्णालय उपविभागासाठी जोरदार स्पर्धा
दरम्यान, जे. जे. रुग्णालय अंतर्गत रुग्णालय बांधकाम आणि दुरुस्ती उपविभाग, भायखळा येथील जागेसाठी अभियंत्यांमध्ये मोठी स्पर्धा सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. उपविभागीय अभियंता रणजित शिंगाडे यांच्या बदलीनंतर ही जागा रिक्त झाली असून अनेक अभियंते या पदासाठी इच्छुक आहेत. मात्र विभागाकडून अद्याप अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे इच्छुक अभियंत्यांमध्ये नाराजीचे वातावरण असल्याचे सांगितले जात आहे.
मुंबईतील रुग्णालय बांधकाम आणि दुरुस्ती उपविभाग तसेच मध्य मुंबई उपविभाग या दोन महत्त्वाच्या जागा सध्या रिक्त ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे पुढील काही दिवसांत आणखी बदल्या होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

