(पोलादपूर /शैलेश पालकर)
पोलादपूर तालुक्यातील क्षेत्रपाळ गावातून गोळेगणी येथे हायस्कूलला जाणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थ्याचे क्षेत्रपाळ येथील आरोपीने अपहरण केल्याची फिर्याद त्याच्या पालकांनी पोलादपूर पोलीस ठाण्यात केली आहे. यातील आरोपीने यापूर्वीही एका अल्पवयीन बालकाचे अपहरण केले असून त्यासंदर्भात प्रकरण न्यायप्रविष्ट असतानाच आरोपीने दुसऱ्यांदा अन्य बालकाचे अपहरण केल्यामुळे पोलादपूर तालुक्यात खळबळ उडाली आहे.
पोलादपूर तालुक्यातील क्षेत्रपाळ गावातील नरेंद्र पांडुरंग शिंदे हे एकविरा अपार्टमेंट, बजरंग नगर, विरार रोड, मोरेगाव, नालासोपारा पूर्व येथे पत्नी सौ. साधना समवेत दुकान चालवून उदरनिर्वाह करीत असून क्षेत्रपाळ गावात त्यांचे वडील पांडुरंग आणि आई जयश्री यांच्याकडे मोठा मुलगा गौरव वय-13वर्षे आणि लहान मुलगा राघव वय-3 वर्षे हे राहात असतात. दि. 24 फेब्रुवारी 2026 रोजी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास क्षेत्रपाळ गावी अखंड हरिनाम सप्ताहाकरीता नरेंद्र शिंदे त्यांच्या पत्नीसोबत आले होते. त्यानंतर ते दोघेही होळी सणानिमित्त क्षेत्रपाळ येथे आई वडील आणि दोन्ही मुलासोबत राहत होते. दिनांक 4 मार्च 2026 रोजी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास त्यांचा मुलगा गौरव हा परसुळे येथे शाळेत निघून गेला. त्यानंतर नरेंद्र पांडुरंग शिंदे हे पत्नीसह असे सकाळी 11वाजण्याच्या सुमारास मुंबई येथे जाण्यास निघाले.
नरेंद्र शिंदे प्रवासात असताना क्षेत्रपाळ गावातील गणेश कदम यांनी मुलगा गौरव याला पोलादपूर येथे सुरेश केरु जाधव यांचे सोबत पाहिल्याचे मोबाईलवरून संपर्क करून सांगितले. यानंतर नरेंद्र शिंदे यांनी त्यांच्या बहिणीचे सासरे एकनाथ शेलार यांना फोन करुन खात्री केली असता त्यांनी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास क्षेत्रपाळ गावातील सुरेश जाधव याच्यासोबत गौरव निघून गेला असल्याचे सांगितले. नरेंद्र शिंदे यांनी सुरेश केरु जाधव याला एक-दोन वेळा फोन करुन मुलगा गौरव याच्याबाबत विचारले असता त्याने गौरव त्याच्यासोबत असल्याचे सांगितले म्हणून त्यावर नरेंद्र शिंदे यांनी गौरवची शाळा चालू असल्याने त्याला क्षेत्रपाळला आईवडीलांच्या घरी सोडण्यास सांगितले. त्यावेळी सुरेश जाधव याने गौरव याला सोडतो असे कबूल केल्याने नरेंद्र शिंदे पत्नीसोबत नालासोपारा येथे घरी जावून सामान ठेवून पुन्हा रात्री उशिरा सुरेश जाधव याला फोन केला. मात्र, त्याचा फोन बंद येत असल्याने नरेंद्र शिंदे यांनी त्यांच्या क्षेत्रपाळच्या घरी फोन करून गौरवबाबत विचारणा केली असता तो घरी आला नसल्याचे समजल्याने नरेंद्र शिंदे आणि त्यांची पत्नी पुन्हा गावी क्षेत्रपाळ आले.
दि. 5 मार्च 2026 रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास सुरेश जाधव याने क्षेत्रपाळ गावातील गणेश कदम याच्या मोबाईलवर फोन केला असता त्यावेळी नरेंद्र जाधव यांचे सुरेश जाधव व त्यांचा मुलगा गौरव याच्यासोबतही बोलणे झाले होते. त्यावेळी सुरेश जाधव याने नरेंद्र जाधव यांना गौरव याला दोन तासात घरी सोडण्याचे कबूल केले. त्यानंतर काही तासाने आईवडीलांनी सुरेश जाधव याला फोन केला असता त्याचा फोन लागला नाही. यामुळे नरेंद्र शिंदे यांनी सुरेश जाधव याची पत्नी व मुली यांना फोन करुन तो पुण्यात गौरवला घेऊन आला आहे का याबाबत विचारपूस केली असता दोघेही पुणे येथे गेले नसल्याचे समजले. सुरेश जाधव हा गौरव याला दोन-तीन दिवसानंतर तरी त्याला घरी सोडेल याची वाट पाहून नरेंद्र शिंदे यांनी पोलादपूर पोलीस ठाण्यामध्ये गौरव या अल्पवयीन बालकाचे अपहरण सुरेश शिंदे याने केल्याची फिर्याद दाखल केली.
पोलादपूर पोलीसांनी तातडीने गौरव आणि आरोपी सुरेश केरू जाधव यांचा शोध घेण्यासाठी मोहिम हाती घेतली असून सहायक पोलीस निरिक्षक आनंद रावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक सतीश पवार, पोलीस हेड कॉन्स्टेबल स्वप्नील कदम, पोलीस सुनील कांजर अधिक तपास करीत आहेत. पोलादपूर पोलीसांनी अपहृत बालक गौरव नरेंद्र शिंदे आणि आरोपी सुरेश केरू जाधव यांची छायाचित्रे सोशल मिडीयावर व्हायरल करून शोध सुरू केला आहे. कोणालाही या दोन्ही व्यक्ती आढळून आल्यास सहायक पोलीस निरिक्षक आनंद रावडे यांना 9011761573 तर स्वप्नील कदम यांना 9049111221 या मोबाईल नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
आरोपी सुरेश केरू जाधव हा क्षेत्रपाळ येथील रहिवासी असून ट्रक ड्रायव्हर व्यवसाय करतो. 10 वर्षांपूर्वी त्याने क्षेत्रपाळ येथील सचिन खुटेकर हा 10 वर्षांच्या अल्पवयीन बालकाचे अपहरण केले होते. त्यावेळी त्याच्याविरूध्द गुन्हा दाखल झाला होता. त्यावेळी अपहरण केलेल्या बालकाला त्याने 5 दिवसांनंतर परत केले होते. अद्याप सदरच्या गुन्हयाचा खटला सुरू असताना आरोपी सुरेश केरू जाधव याने गौरव नरेंद्र शिंदे या 13 वर्षीय अल्पवयीन शाळकरी विद्यार्थ्याचे अपहरण केले आहे. यामुळे पोलादपूर तालुक्यामध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.
(फोटो : अपहृत बालक गौरव शिंदे आणि आरोपी सुरेश केरू जाधव)

