(संगमेश्वर / प्रतिनिधी)
संगमेश्वर परिसरात सायबर गुन्हेगारीचे आणखी एक गंभीर प्रकरण उघडकीस आले असून, एका उच्चशिक्षित इंजिनिअर तरुणाची तब्बल २ लाख २५ हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी संगमेश्वर पोलीस ठाण्यात अज्ञात सायबर भामट्यांविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नावडी-संगमेश्वर येथील रहिवासी शशांक प्रकाश सावंत (वय ३५) हे पेशाने इंजिनिअर असून, एका खासगी कंपनीत नोकरीस आहेत. ३० मे ते १ जून २०२६ या कालावधीत अज्ञात सायबर गुन्हेगाराने त्यांच्या बँक खात्यांमध्ये घुसखोरी करत परस्पर व्यवहार करून मोठ्या रकमेची फसवणूक केली. सदर भामट्याने बँक ऑफ इंडिया, संगमेश्वर शाखेतील खात्यातून ९५ हजार व ८० हजार रुपये असे एकूण १ लाख ७५ हजार रुपये ऑनलाईन पद्धतीने काढून घेतले. त्यानंतर जनता सहकारी बँक लिमिटेड, पुणे (शाखा संगमेश्वर) येथील खात्यातून आणखी ५० हजार रुपये काढून घेत एकूण २ लाख २५ हजार रुपयांचा आर्थिक घोटाळा करण्यात आला.
आपल्या खात्यांमधून अनधिकृत व्यवहार झाल्याचे लक्षात येताच शशांक सावंत यांनी तत्काळ संगमेश्वर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी १२ जून २०२६ रोजी रात्री १९.४७ वाजण्याच्या सुमारास अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, सायबर पोलिसांकडूनही या व्यवहारांचा मागोवा घेतला जात आहे. दरम्यान, नागरिकांनी कोणालाही आपले बँक तपशील, ओटीपी किंवा वैयक्तिक माहिती शेअर करू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. सायबर फसवणुकीच्या वाढत्या घटनांमुळे परिसरात चिंता व्यक्त होत असून, अधिक सतर्कता बाळगण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

