(संगमेश्वर / एजाज पटेल)
लग्नकार्यासाठी पैशांची नड असल्याचे सांगून बनावट सोन्याचे दागिने गळ्यात मारून एका तरुणाची साडेतीन लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संगमेश्वर एसटी स्थानक परिसरात हा व्यवहार झाला असून, याप्रकरणी दोन अनोळखी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संगमेश्वर पोलिसांकडून मिळालेल्या माहिती नुसार , या प्रकरणातील फिर्यादी दिलेश प्रकाश गुजर (रा. बेनी खुर्द गुजरवाडी) हे २० एप्रिल २०२६ रोजी लांजा येथील ‘यंग लुक’ या कपड्याच्या दुकानात कामावर असताना हा प्रकार घडण्यास सुरुवात झाली. दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास दोन अनोळखी व्यक्ती या दुकानात आल्या. त्यांनी फिर्यादी यांच्याशी जवळीक साधत, आमच्या गावाकडे लग्न आहे आणि सध्या आम्ही मोठ्या आर्थिक अडचणीत आहोत, असे भासवले. आमच्याकडे काही जुन्या धाटणीचे सोन्याचे दागिने असून ते आम्हाला तातडीने विकायचे आहेत, अशी बतावणी त्यांनी केली.
फिर्यादी यांचा विश्वास संपादन करण्यासाठी आरोपींनी त्यांच्याकडे असलेले जोंधळी मणी आणि तारेत गुंफलेले हारासारखे दागिने दाखवले. या दागिन्यांची खात्री करून घेण्यासाठी आरोपींनी त्याच हारातील दोन-तीन मणी फिर्यादी यांना दिले. दिलेश गुजर यांनी त्या मण्यांची तपासणी केली असता ते खरे सोने असल्याची त्यांची खात्री पटली. त्यानंतर आरोपींनी त्यांच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधून संपूर्ण दागिने ३ लाख ५० हजार रुपयांना देण्याचे मान्य केले.
हा आर्थिक व्यवहार करण्यासाठी आरोपींनी फिर्यादी यांना संगमेश्वर एसटी स्थानक येथे बोलावून घेतले. ठरल्याप्रमाणे फिर्यादी त्या ठिकाणी रोख रक्कम घेऊन पोहोचले. आरोपींनी त्या ठिकाणी फिर्यादी यांचा पूर्ण विश्वास संपादन केला आणि जोंधळी मणी तारेत गुंफलेले दागिने हे अस्सल सोन्याचेच आहेत असे भासवले. विश्वासापोटी फिर्यादी यांनी ३ लाख ५० हजार रुपये आरोपींच्या स्वाधीन केले आणि दागिने ताब्यात घेतले. मात्र, काही वेळाने त्या दागिन्यांची पुन्हा सखोल तपासणी केली असता, ते दागिने बनावट असल्याचे निष्पन्न झाले.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच दिलेश गुजर यांनी तातडीने पोलिसांत धाव घेतली. या तक्रारीवरून संगमेश्वर पोलीस ठाण्यात संबंधित आरोपींविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा प्राथमिक खबरी अहवाल देवरुख येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात पाठवण्यात आला असून, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना या घटनेची माहिती बिनतारी संदेशाद्वारे देण्यात आली आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण देसाई करत आहेत. दरम्यान, अशा प्रकारे कोणत्याही आमिषाला बळी पडू नये किंवा अनोळखी व्यक्तींकडून सोन्याची खरेदी करताना काळजी घ्यावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

