(संगमेश्वर / एजाज पटेल)
संगमेश्वर तालुक्यातील कोंड असुर्डे येथे गाढ झोपेत असलेल्या कुटुंबाच्या घरात अज्ञात चोरट्याने धाडसी चोरी करत रोख रकमेसह मौल्यवान दागिने लंपास केले. ही घटना १८ जुलैच्या रात्री घडली असून, चोरट्याविरोधात संगमेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विनायक कृष्णनाथ संसारे यांच्या घरात रात्री सुमारे दोनच्या सुमारास चोरट्याने प्रवेश केला. कुटुंबातील सर्व सदस्य गाढ झोपेत असताना, चोरट्याने घराच्या किचनमधील स्लायडिंग खिडकीचा लॉक उचकटून आत प्रवेश केला. त्यानंतर हॉलमध्ये झोपलेल्या विनायक संसारे यांच्या उशीजवळ ठेवलेला मोबाईल फोन आणि रोख रक्कम हातोहात लंपास केली.
त्यानंतर चोरट्याने घरातील बेडरूममध्ये प्रवेश करून कपाटाची किल्ली मिळवली. ती वापरून त्याने कपाट उघडले आणि त्यातील रु. ११,००० रोख, चांदीची पैंजन, दोन जोड जोडव्या, सोन्याची पुली, एक ग्रॅम सोन्याचा मुलामा असलेली चैन व मंगळसूत्र असा एकूण सुमारे २७,५०० रुपयांचा ऐवज चोरून नेला.
सकाळी विनायक संसारे यांचा मुलगा सिद्धेश याने बेडरूममध्ये प्रवेश केला असता कपाट उघडे व सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसले. त्याने तात्काळ ही माहिती घरातील सदस्यांना दिली. तपासणीअंती किचनच्या खिडकीचा लॉक तुटलेला असल्याचे लक्षात आल्यानंतर घरात चोरी झाल्याचे स्पष्ट झाले.
चोरीची माहिती मिळताच संगमेश्वर पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घराचा पंचनामा केला, तसेच श्वानपथकाच्या मदतीने चोरट्याचा माग घेण्याचा प्रयत्न केला; मात्र चोरट्याचा मागमूस लागला नाही.
या प्रकरणी संगमेश्वर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात भादंवि कलम ३३१(४), ३०५(अ) अंतर्गत गुन्हा (गुन्हा क्र. ९९/२०२५) दाखल करण्यात आला असून, पोलीस हेडकॉन्स्टेबल विनय मनवल हे पोलीस निरीक्षक चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास करत आहेत.