(राजापूर)
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच असून, राजापूर तालुक्यातील ओणी पुलाजवळ शनिवारी पहाटे झालेल्या भीषण अपघातात एका ट्रक चालकाचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेमुळे महामार्गावरील भरधाव वाहतुकीचा आणि बेदरकार वेगाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कोलगाव (ता. सावंतवाडी) येथील दत्तप्रसाद परुळेकर हे सहकारी वीरेंद्र सावंत यांच्यासह मुंबई येथे आंब्याची वाहतूक करून ट्रकने सावंतवाडीकडे परतत होते. पहाटे सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास ओणी पुलाजवळ त्यांनी लघुशंकेसाठी ट्रक रस्त्याच्या कडेला इंडिकेटर सुरू करून उभा केला होता. याचदरम्यान मुंबईहून गोव्याच्या दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या दुसऱ्या ट्रकने त्यांच्या ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. धडकेचा आवाज इतका भीषण होता की परिसरात काही क्षणांतच खळबळ उडाली. ट्रकजवळ उभे असलेले दत्तप्रसाद परुळेकर यांना या धडकेत जबर मार बसला आणि ते काही अंतर फरफटत गेले. गंभीर दुखापतीमुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.
या भीषण अपघातात वीरेंद्र सावंत हे थोडक्यात बचावले असून त्यांना कोणतीही दुखापत झाली नसल्याची माहिती मिळाली आहे. अपघातानंतर जखमी परुळेकर यांना तातडीने राजापूर ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले; मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक अमित यादव यांच्यासह राजापूर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून वाहतूक सुरळीत करण्याचे काम हाती घेतले. या प्रकरणी पुढील तपास राजापूर पोलिस करीत आहेत.
दरम्यान, मुंबई-गोवा महामार्गावरील सातत्याने वाढणाऱ्या अपघातांच्या घटनांमुळे वाहनचालकांमध्ये चिंता व्यक्त होत असून, वेगमर्यादांचे काटेकोर पालन आणि सुरक्षाव्यवस्थेबाबत अधिक प्रभावी उपाययोजनांची मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे.

