(देवळे / प्रकाश चाळके)
साखरपा येथील श्रीमान तुकाराम गणशेठ गांधी महाविद्यालयाला ‘स्टार एज्युकेशन अवॉर्ड २०२६’ हा मानाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी संस्थेने केलेल्या कार्याची दखल घेत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला असून, या सन्मानामुळे शाळेचा राष्ट्रीय स्तरावर गौरव झाला आहे.
एज्युकेशन सपोर्ट फ्रंचाईज एक्सपो आणि टाइम्स ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणाऱ्या ‘स्टार एज्युकेशन अवॉर्ड २०२६’साठी कोंडगाव येथील श्रीमान तुकाराम गणशेट गांधी विद्यालयाची निवड करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी विद्यालयाने आजवर केलेल्या कार्याची दखल घेऊन या पुरस्कारासाठी संस्थेची निवड करण्यात आली.
मुंबई येथील नेस्को सेंटरमध्ये नुकत्याच झालेल्या भव्य कार्यक्रमात या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. ग्रुप ऑफ एज्युकेशन इंस्ट्यिट्यूट, वाराणसीच्या अमृता बर्मन यांच्या हस्ते श्रीमान तुकाराम गणशेट गांधी विद्यालयाला सन्मानचिन्ह प्रदान करून गौरविण्यात आले.
या पुरस्कार वितरण सोहळ्याला विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती रंजन माधव रेमणे यांच्यासह शिक्षक उपस्थित होते. पुरस्कार प्राप्त होण्यासाठी संस्था पदाधिकारी, सदस्य, आजी-माजी शिक्षक आणि पालकांचा मोठा सहभाग असल्याची प्रतिक्रिया मुख्याध्यापिका रंजन रेमणे यांनी व्यक्त केली. या पुरस्कारामुळे विद्यालयाची राष्ट्रीय स्तरावर नवीन ओळख निर्माण झाली असल्याचेही त्यांनी सांगितले.
या उल्लेखनीय कामगिरीबद्दल संस्था अध्यक्ष कमलाकर पाथरे, सचिव अजय सावंत, मुख्याध्यापिका रंजन रेमणे तसेच सर्व शिक्षकांचे पंचक्रोशीतून अभिनंदन होत आहे.


