(ठाणे / वृत्तसंस्था)
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहरातील विविध भागांत आगीच्या घटनांची मालिका घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वागळे इस्टेट येथील रहेजा गार्डन गृहसंकुलातील कारलाईन इमारतीला रविवारी रात्री भीषण आग लागली. आठव्या मजल्यावर लागलेल्या आगीने काही वेळातच चौदाव्या मजल्यापर्यंत मजल मारली. या दुर्घटनेमुळे इमारतीतील रहिवाशांची मोठी धावपळ उडाली. अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. या कारवाईत ३० रहिवाशांची सुखरूप सुटका करण्यात आली, तर १५ ते १६ जणांना इमारतीतील सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले.
इटरनिटी मॉलसमोरील तळ अधिक १७ मजली असलेल्या या इमारतीत रविवारी रात्री ८.३० ते ८.३१ वाजण्याच्या सुमारास आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाला मिळाली. प्राथमिक माहितीनुसार, आगीची सुरुवात आठव्या मजल्यावर झाली आणि ती वेगाने चौदाव्या मजल्यापर्यंत पसरली. काही कुटुंबे वरच्या मजल्यांवर अडकली होती. त्यांच्याशी व्हिडिओ कॉलद्वारे संपर्क साधून त्यांना टेरेसच्या दिशेने जाण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी दिल्या.
घटनेची माहिती मिळताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन बचावकार्यावर लक्ष ठेवले. खासदार नरेश म्हस्के यांच्या देखरेखीखाली अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाचे जवान आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करत होते. आमदार निरंजन डावखरे, आमदार रवींद्र फाटक, पोलीस उपायुक्त प्रशांत कदम आणि स्थानिक नगरसेवक विकास रेपाळे यांनीही मदतकार्यामध्ये सहभाग घेतला. आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे अधिकारी-कर्मचारी आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी दोन ब्रांटो फायर वाहने, दोन फायर वाहने, एक वॉटर टँकर आणि एक जम्बो वॉटर टँकरच्या सहाय्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. जवळपास अडीच ते तीन तास बचावकार्य सुरू होते.
या दुर्घटनेत ३० रहिवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले, तर १५ ते १६ रहिवाशांना इमारतीमध्येच सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले. त्यांना बाहेर काढण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती. या घटनेत कोणीही जखमी नसल्याची माहिती खासदार नरेश म्हस्के यांनी दिली होती. मात्र, आगीत महेश धस (४६), रीना धस (४६), वेदांत धस (१८) आणि राजेंद्र जोशी (६७) हे चौघे जखमी झाले असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घरात अडकलेल्या शाहिद आनंद (३२), स्वामिनी पराडकर (३५) आणि एका पाळीव कुत्र्याचीही अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरूप सुटका केली. आगीमुळे दोन सदनिकांचे मुख्य दरवाजे, विद्युत वायरिंग आणि लिफ्टचे नुकसान झाले आहे.
या आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, सातव्या मजल्यावर लाकडी चप्पल स्टँडवर ठेवलेल्या दिव्यामुळे किंवा विद्युत माळांमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. आगीत होरपळलेले धस कुटुंबीय लिफ्टने सातव्या मजल्यावर आले असताना त्यांना आगीची माहिती मिळाली. मात्र, तोपर्यंत आगीने भीषण स्वरूप धारण केले होते. त्यामुळे त्यांना दुखापत झाल्याची माहिती अग्निशमन दलाच्या जवानांनी दिली.
दरम्यान, ठाणे शहरात केवळ रहेजा गार्डनमधील आगीची घटना घडली नसून कासारवडवली, घोडबंदर रोड आणि कळवा परिसरातील गृहसंकुलांमध्येही आगीच्या घटना समोर आल्या आहेत. फटाक्यांची आतषबाजी आणि घरांमध्ये लावलेल्या दिव्यांमुळे या दुर्घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनांमध्ये घरातील साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, काही रहिवासी जखमी झाले आहेत.
कासारवडवली येथील सांघवी हिल्स या सात मजली इमारतीच्या कॉरिडॉरमध्ये शनिवारी रात्री उशिरा आग लागली. या दुर्घटनेत चार रहिवासी होरपळले. अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवताना इमारतीत अडकलेल्या दोन रहिवाशांसह एका कुत्र्याचीही सुरक्षित सुटका केली. घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यासिन तडवी, मुख्य अग्निशमन अधिकारी गिरीश झळके, बाळकूम अग्निशमन केंद्राचे स्थानक अधिकारी ओंकार वैती, अमित घोलप, निलेश वेताळ, पालिकेच्या आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी राजकुंवर निकम तसेच कासारवडवली पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी दाखल झाले होते. अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कर्मचाऱ्यांनी सुमारे तासाभरात आग पूर्णपणे आटोक्यात आणली.
कळवा येथील कावेरी सेतू परिसरातील आशर गृहसंकुलातील २९ व्या मजल्यावरही आग लागली. संबंधित सदनिकेतील रहिवासी त्यावेळी घराबाहेर असल्याने मोठा अनर्थ टळला. याशिवाय वर्तकनगर प्रभाग समितीच्या मागील बाजूस कचऱ्याला, तर ठाणे पूर्वेकडील कोपरी येथील सिद्धार्थ नगर परिसरात लाकडी डेकोरेशन साहित्याला आग लागल्याच्या घटना घडल्या. या सर्व घटनांमुळे दिवाळीच्या काळात ठाणे शहरातील अग्निसुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.


