(सांगली / वृत्तसंस्था)
दिवाळीच्या सुट्टीसाठी गावी आलेल्या वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीशांचा शेतातील अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. कवठेमहांकाळ तालुक्यातील देशिंग येथे रविवारी दुपारी ही घटना घडली. शेतात तुटून पडलेल्या ११ केव्ही उच्चदाब विद्युत वाहिनीचा स्पर्श झाल्याने तुकाराम पतंग मोटे (४२, रा. हरोली, ता. कवठेमहांकाळ, जि. सांगली) यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे देशिंगसह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. आगीत दोन हेक्टरहून अधिक ऊसही जळून गेला.
तुकाराम मोटे हे वसई येथे वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश म्हणून कार्यरत होते. दिवाळीच्या सुट्टीसाठी ते गावी आले होते. देशिंग येथे त्यांची आणि आप्पासाहेब कोळेकर यांची शेजारी शेजारी ऊस शेती आहे. रविवारी दुपारी या शेतातील उसाला आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर मोटे हे घटनास्थळी पाहणी करण्यासाठी गेले होते.
यावेळी शेतात तुटून पडलेल्या ११ केव्ही उच्चदाब विद्युत वाहिनीचा त्यांना स्पर्श झाला. त्यामुळे विजेचा तीव्र धक्का बसून त्यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, लागलेल्या आगीत दोन हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील ऊस जळून खाक झाला आहे. सुट्टीसाठी गावी आलेल्या न्यायाधीशांचा अशा प्रकारे दुर्दैवी अंत झाल्याने परिसरातून शोक व्यक्त केला जात आहे.


