सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर जवळील कटफळ ही जन्मभूमी असलेले व आपल्या उत्तम अध्यापन कौशल्या द्वारे विद्यार्थ्यांना आदर्श नागरिकत्वाचे धडे देऊन विद्यार्थ्यांचे “विठ्ठल” म्हणून खेड तालुक्यात प्रसिद्ध असलेले आदर्श शिक्षक म्हणजे भारत घुटुकडे सर
भारत महादेव घुटुकडे हे 8 जानेवारी 2004 या दिवशी खेड तालुक्यातील वरवली धनगर या अत्यंत दुर्गम अशा शाळेमध्ये हजर झाले. वरवली धनगरवाडी येथेच राहून धनगर वाडीतील मुलांच्या जीवनात ज्ञानरूपी प्रकाश निर्माण केला. पहिल्या पाच वर्षांमध्ये त्यांनी अनेक विद्यार्थी घडवले. त्यांचे अनेक विद्यार्थी पोलीस दलात व सैन्य दलात कार्यरत आहेत.
2009 ला ते बदलीने हुंबरी खालची या शाळेमध्ये हजर झाले या ठिकाणी त्यांनी तब्बल तेरा वर्ष सेवा केली. ज्यावेळी घुटुकडे सर हुंबरी खालची शाळेमध्ये हजर झाले, त्यावेळी शाळेची इमारत अत्यंत जुन्या पद्धतीची व नादुरुस्त होती. घुटूकडे सर यांनी ग्रामस्थांना हाताशी धरून सतत पाठपुरावा करून शाळेसाठी दोन नवीन वर्गखोल्या मंजूर करून घेतल्या. आणि हुंबरी खालची शाळेची नवीन देखणी अशी इमारत उभी राहिली. शाळेच्या बांधकामाच्या वेळेला घुटूकडे सर यांनी वैयक्तिक लक्ष दिले.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाबरोबरच त्यांचा शारीरिक विकास झाला पाहिजे यासाठी घुटुकडे सर यांनी क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून अनेक जिल्हास्तरीय स्पर्धांमध्ये खेळणारे विद्यार्थी तयार केले. या सर्वांचा उपयोग विद्यार्थ्यांना भविष्यात त्यांच्या करिअर उभारणीत झाला. घुटुकडे सर यांनी तयार केलेले अनेक विद्यार्थी त्यांच्या पुढील काळात कबड्डी खो-खो या खेळात चमकले. त्यानंतर 2022 मध्ये घुटुकडे सर हे बदलीने हुंबरी वरची या शाळेमध्ये आले.
विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेचे मार्गदर्शन करणे यात घुटुकडे सरांचा हातखंडा आहे त्यामुळेच हुंबरी वरची शाळेतील अनेक विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत यशस्वी झाले. नुकतीच त्यांची चिपळूण तालुक्यातील या शाळेमध्ये बदली झाली आहे. मात्र गेली 21 वर्षे त्यांनी खेड तालुक्यात शिक्षक म्हणून जी सेवा केली आहे ती खरोखरच वाखाणण्यासारखीच आहे.
आंबवली प्रभागातील विविध शाळांमध्ये ज्ञानदानाचे पवित्र कार्य करत असतानाच भारत घुटुकडे सर हे तत्कालीन शिक्षक समितीचे जिल्हा उपाध्यक्ष व वरवली चे सुपुत्र स्वर्गीय गोविंद यादव सर यांच्या संपर्कात आले. गोविंद यादव सर यांनी घुटुकडे सर यांच्या अंगी असलेले संघटना कौशल्य ओळखले होते. गोविंद यादव यांनी भारत घुटुकडे यांची भेट त्यावेळी खेड तालुक्यात शिक्षक समितीमध्ये नवचैतन्य निर्माण करणारे माजी चेअरमन सुनील सावंत यांच्याशी घालून दिली.
प्राथमिक शिक्षक पतपेढीच्या 75 वर्षाच्या इतिहासात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचा संचालक खेड तालुक्यामध्ये नव्हता. मात्र हा डाग पुसून काढायचाच असे ठरवून सुनील सावंत यांनी पूर्ण तालुका पिंजून काढला. सुनील सावंत यांनी आंबवली विभागातील शिक्षक समितीची ताकद ओळखली होती. स्वर्गीय गोविंद यादव, सुधाकर शिर्के संतोष यादव संजय यादव दिलीप यादव अनिल यादव आनंद वळवी नवनाथ दहिफळे सूर्यकांत चौरे संजय पुजारी असे अनेक कार्यकर्ते सुनील सावंत यांनी तयार केले त्याचवेळी सुनील सावंत यांनी भारत घुटुकडे यांची संघटनात्मक ताकद ओळखून भारत घुटुकडे यांना महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती मध्ये सक्रिय केले भारत घुटुकडे हे शिक्षक समितीचे नवे उमदे नेतृत्व आंबवली विभागात तयार झाले.
गेली वीस वर्षे अंबवली विभागामध्ये कोणताही शिक्षक समितीचा कार्यक्रम असेल तर त्याची धुरा घुटुकडे सर हे सांभाळत होते. आंबवली विभाग हा शिक्षक समितीचा बालेकिल्ला बनवण्यात भारत घुटुकडे सर यांचा मोलाचा वाटा आहे. सुनील सावंत यांना प्राथमिक शिक्षक पतपेढीचा दोन वेळा संचालक बनवण्यासाठी भारत घुटुकडे सर यांनी अपार मेहनत घेतली. घुटुकडे सर हे चाटव येथील कॉलनीत राहायचे ही कॉलनी म्हणजे आंबवली विभागातील शिक्षक समितीचे कार्यालयच होते. शिक्षक समिती वाढवण्यासाठी घुटुकडे सर यांनी आंबवली विभागामध्ये अनेक कार्यक्रम घेतले. शिक्षक समितीचे खेड येथील प्रत्येक कार्यक्रमात व प्रत्येक सभेला घुटुकडे सर यांनी हजेरी लावली.
जिल्हास्तरावर कोणतेही आंदोलन असो अगर कोणताही कार्यक्रम असो त्यावेळी आंबवली विभागातील शिक्षक समिती सभासद नेहमीच अग्रेसर राहायचे. जिल्हा कार्यकारणी मध्ये काम करणारे श्रीकृष्ण खांडेकर यांसारखे शिक्षक समितीचे नव्या दमाचे कार्यकर्ते भारत घुटुकडे यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झाले. अजित भोसले यांच्या अध्यक्षतेखाली भारत घुटुकडे यांनी संघटना वाढवण्यासाठी अतोनात मेहनत घेतली शरद भोसले सर यांच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीमध्ये भारत घुटुकडे यांचे संघटनात्मक कार्य खऱ्या अर्थाने बहरले. शरद भोसले यांच्या खांद्याला खांदा लावून संघटना वाढीसाठी घुटुकडे सर यांनी अहोरात्र मेहनत घेतली. घुटुकडे सर यांनी ठरवले असते तर संघटनेचे कोणतेही पद त्यांना सहज मिळाले असते.
सध्या महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे तालुकाध्यक्ष संतोष चव्हाण सर हे आहेत. या कार्यकारणी मध्ये भारत घुटुकडे यांना सामील करून घेण्यासाठी चव्हाण सर यांनी गळ घातली. मात्र घुटुकडे सर यांनी नम्रपणे पद स्वीकारण्यास नकार दिला. त्यांनी निरपेक्ष भावनेने महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती या संघटनेची सेवा केली. आंबवली विभागातील अनेक कार्यकर्त्यांना भारत घुटुकडे यांच्यामुळे तालुकास्तरावर वेगवेगळी पदे मिळाली. परंतु आजतागायत ते महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे एक सामान्य सभासद म्हणून कार्यरत आहेत. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती तालुका शाखा खेड या शाखेमध्ये भारत घुटुकडे सर यांनी केलेल्या निरपेक्ष सेवेबद्दल त्यांना खेड तालुक्यातून निरोप देण्यासाठी शिक्षक समिती शाखा खेडतर्फे त्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला आहे.
भारत घुटुकडे यांची नुकतीच चिपळूण तालुक्यातील अलोरे कॉलनी येथे बदली झाली आहे. परंतु ज्या तर्फेने भारत घुटुकडे सर यांनी खेडमध्ये शिक्षक समिती वाढवण्यासाठी प्रयत्न केले त्याच तडफेने ते चिपळूणमध्ये देखील संघटनेचे काम करतील त्याचबरोबर अलोरे कॉलनीतील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता व शारीरिक गुणवत्ता वाढवण्यासाठी नक्कीच प्रयत्न करतील. श्री भारत घुटुकडे यांच्या चिपळूण तालुक्यातील भावी कारकीर्दीसाठी शुभेच्छा
– शैलेश केशव पराडकर
प्रवक्ता, शिक्षक समिती खेड

