(ठाणे / वृत्तसंस्था)
पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिची गळा आवळून हत्या केल्यानंतर पतीनेही रेल्वेखाली उडी घेत आत्महत्या केल्याची घटना नालासोपारा येथे घडली आहे. या घटनेत तबस्सुम खान (४१) आणि माजिद खान (५०) या पती-पत्नीचा मृत्यू झाला. शनिवारी (७ नोव्हेंबर) पहाटे घरात झालेल्या वादातून माजिदने पत्नीची हत्या केली. त्यानंतर मुंबईतील ग्रँट रोड रेल्वे स्थानकात दुपारी लोकलसमोर उडी घेऊन त्यानेही आपले जीवन संपवले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
माजिद आणि तबस्सुम हे आपल्या मुलांसह नालासोपारा पश्चिमेकडील टाकीपाडा परिसरात वास्तव्यास होते. गेल्या काही दिवसांपासून माजिद पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. तिचे अन्य व्यक्तीसोबत संबंध असल्याची त्याला शंका होती. याच मुद्द्यावरून दोघांमध्ये वारंवार वाद होत असल्याची माहिती समोर आली आहे. घरातील तणाव वाढत असतानाच शनिवारी पहाटे पुन्हा दोघांमध्ये जोरदार भांडण झाले.
पहाटे सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास झालेल्या वादादरम्यान माजिदने रागाच्या भरात तबस्सुम यांचा गळा आवळला. या प्रकारात त्यांचा मृत्यू झाला. पत्नीची हत्या केल्यानंतर माजिद घरातून बाहेर पडला आणि मुंबईतील ग्रँट रोड रेल्वे स्थानकावर पोहोचला. तेथे आलेल्या लोकलसमोर त्याने उडी घेतली. या घटनेत माजिदचाही मृत्यू झाला. एकाच दिवशी पती-पत्नीचा मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेचा सर्वाधिक फटका त्यांच्या मुलांना बसला असून, त्यांच्यावर मोठे संकट ओढवले आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी दोन्ही घटनांचा तपास सुरू केला. पत्नीच्या हत्येप्रकरणी नालासोपारा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. पत्नीच्या चारित्र्यावरून निर्माण झालेल्या संशयातून घरगुती वादाचे रूपांतर हत्येत झाल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.


