(रत्नागिरी / वार्ताहर)
उन्हाळी सुट्ट्यांमुळे कोकण रेल्वे मार्गावर प्रवाशांची वाढलेली गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने मडगाव – पनवेल दरम्यान अतिरिक्त साप्ताहिक ‘समर स्पेशल’ ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कोकण मार्गावरील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
गाडी क्रमांक ०११०६ मडगाव – पनवेल साप्ताहिक स्पेशल रविवार दिनांक १० मे २०२६ रोजी मडगाव जंक्शन येथून दुपारी ४:३० वाजता सुटणार असून दुसऱ्या दिवशी पहाटे ४ वाजता पनवेल येथे पोहोचणार आहे. तर गाडी क्रमांक ०११०५ पनवेल – मडगाव साप्ताहिक स्पेशल सोमवार दिनांक ११ मे २०२६ रोजी पहाटे ५:४५ वाजता पनवेल येथून सुटून त्याच दिवशी सायंकाळी ६:१० वाजता मडगाव जंक्शनला पोहोचेल.
ही विशेष ट्रेन करमळी, थिवीम, सावंतवाडी रोड, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, वैभववाडी रोड, राजापूर रोड, विलवडे, आडवली, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, चिपळूण, खेड, माणगाव, रोहा आणि पेण या स्थानकांवर थांबा घेणार आहे.
या विशेष गाडीत एकूण २३ डबे असणार असून त्यामध्ये ३ एसी थ्री टियर, ११ स्लीपर, ७ जनरल आणि २ एसएलआर डब्यांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी प्रवाशांनी भारतीय रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा ‘KR Mirror’ ॲपचा वापर करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

