(खेड)
शनिवारी रात्रभर पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे खेडमधील जगबुडी नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. नदीची इशारा पातळी पाच मीटर असून, धोक्याची पातळी सात मीटर आहे. सद्यःस्थितीत पाण्याची पातळी ५.४० मीटर इतकी आहे. नदीने इशारा पातळी ओलांडल्याने प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. पूर्वप्रवण क्षेत्रातील गावांना स्थलांतराचे आवाहनही केले आहे.
मुसळधार पावसामुळे खेड-दापोली मार्गावर खेड शहरातील एकवीरानगर परिसरात मुख्य रस्त्यावर नारंगी नदीला आलेल्या पुराचे पाणी साचल्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे खेड, दापोली आणि मंडणगड या तीन तालुक्याचा संपर्क पुराच्या पाण्यामुळे तुटला होता. या मार्गावर जाणाऱ्या एसटी बसेस तसेच सर्व वाहने रात्रभर खोळंबून राहिली होती. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी रस्त्यावर झाडे कोसळून पडल्याच्या घटना घडल्या. खोपी मार्गावर कुळवंडी येथे तर खेड-शिवतर मार्गावर चाकाळे कोळकेवाडी या ठिकाणी मध्यरात्री रस्त्यावर झाड कोसळल्यामुळे या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.