(रत्नागिरी / वार्ताहर)
रत्नागिरी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा शिळ येथील विद्यार्थ्यांचा सहभाग असलेला ‘बाल जगत’ हा विशेष कार्यक्रम रविवार, १० मे २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता आकाशवाणी रत्नागिरी केंद्र वरून प्रसारित केला जाणार आहे. या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी विविध सामाजिक, शैक्षणिक आणि प्रेरणादायी विषयांवर आधारित सादरीकरणे केली आहेत.
या कार्यक्रमात निधी शिळकर, युग वाडकर, देवांग पवार, मिस्त्री सनगरे, त्रिष्णा वाडकर, प्रांजल ओरपे, दूर्वा चापडे आणि तनिष्का बसरे या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला आहे.
‘बाल जगत’ कार्यक्रमातून सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारी प्रार्थना, संविधानाचे महत्त्व, जिल्हा परिषद शाळांची महती, सर्वांना शिक्षणासाठी शाळेत प्रवेश घेण्याचे आवाहन, इंधन बचतीवर आधारित छोट्या नाटिका तसेच सामाजिक जागृती करणारे संदेश सादर करण्यात आले आहेत. याशिवाय “गावकऱ्यांनो, शाळेसाठी जगून जरासे पाहूया” हे गीत, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार, तिरंग्याचे महत्त्व, “गोष्ट जुनी पण संदेश नवा” आणि “उद्याची तरतूद” यांसारख्या बोधकथांचाही समावेश कार्यक्रमात करण्यात आला आहे.
या कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक मकसूद सय्यद आणि उपशिक्षिका वृषाली विभाकर नाचणकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे. कार्यक्रमाचे निवेदन सोनाली सावंत यांनी केले असून सादरकर्ते विवेक वानखडे आहेत.
या प्रेरणादायी कार्यक्रमाचा लाभ सर्व रसिक श्रोत्यांनी घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

