(गणपतीपुळे / वैभव पवार)
शैक्षणिक क्षेत्रात विविध प्रयोग होत असून त्यामुळे पूर्वीच्या काळातील शिक्षण आणि आताच्या शिक्षणात प्रचंड फरक पडला आहे. संपूर्ण महाराष्ट्रात शासनाचे काम करत असताना रत्नागिरी जिल्हा हा शैक्षणिकदृष्ट्या सर्व क्षेत्रांत अत्याधुनिक स्वरूपासह प्रगत बनत आहे. काळाच्या ओघात हा जिल्हा भविष्यात शैक्षणिक हब ठरणार असून, माझ्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना कालानुरूप शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध करून देण्याचा मानस आहे. रत्नागिरी जिल्हा शैक्षणिकदृष्ट्या प्रगत होत असल्याचा अभिमान वाटतो, असे मत महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी व्यक्त केले. ते रत्नागिरी तालुक्यातील आदर्श जीवन शिक्षण शाळा मालगुंड क्रमांक १ च्या शतकोत्तर अमृतमहोत्सवी वर्षाच्या उद्घाटन सोहळ्यात बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, रत्नागिरी हा नररत्नांची खाण आहे. या जिल्ह्यात वेगवेगळ्या क्षेत्रांत महनीय व्यक्तिमत्त्वे घडली असून त्यांच्या आदर्शांचे अनुकरण करण्याची आज समाजाला गरज आहे. आदर्श जीवन शिक्षण शाळेला १७५ वर्षांची परंपरा लाभली आहे, ही मालगुंडवासीयांसाठी अभिमानाची बाब आहे. या शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी आश्वासन दिले. पूर्वीच्या काळातील शैक्षणिक साधनांमध्ये आणि आताच्या अत्याधुनिक साधनांमध्ये प्रचंड बदल झाला असून, हे बदल समाजातील प्रत्येकाने स्वीकारणे आवश्यक आहे. बदलत्या काळानुसार शिक्षकांनी शिक्षणपद्धतीत बदल स्वीकारले पाहिजेत. तसेच प्रत्येक विद्यार्थ्यांच्या पालकांनीही हा बदल स्वीकारून आपल्या मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी पुढाकार घ्यावा. ज्या महामानवांनी हा देश उभारला त्यांच्या कार्याचा आदर्श घेऊन कार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
मालगुंड येथे आज (शनिवारी) झालेल्या शुभारंभ सोहळ्यात डॉ. सामंत व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांचे शाळा समिती व स्थानिक नागरिकांच्या वतीने स्वागत करण्यात आले. यानंतर शाळेच्या शतकोत्तर अमृतमहोत्सवी वर्षाचा लोगो अनावरण, सरस्वती पूजन, दीपप्रज्वलन व शुभारंभ फलकाचे अनावरण करण्यात आले. महिलांनी मराठमोळ्या पोशाखात १७५ दिव्यांनी ओवाळणी करून सोहळ्याला विशेष आकर्षण दिले. या निमित्ताने १७५ वृक्ष लागवडीचा संकल्प करण्यात आला, ज्याचा शुभारंभ विश्वनाथ साळवी यांनी केला. त्यानंतर मालगुंड येथील बळीराम परकर विद्यालयातील कै. सदानंद बळीराम परकर सभागृहात मुख्य कार्यक्रमाचे उद्घाटन मंत्री डॉ. सामंत यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले.
या सोहळ्यात समिती सदस्य गजानन पाटील यांनी शाळेचा इतिहास सांगत विविध उपक्रमांचा आढावा घेतला व वर्षभर राबविण्यात येणाऱ्या कार्यक्रमांचे स्वरूप स्पष्ट केले. त्यांनी शाळेच्या विकासासाठी मंत्री सामंत यांच्याकडे विनंती केली. समिती सदस्य सुनील मयेकर यांनीही शाळेच्या वैशिष्ट्यपूर्ण बाबी अधोरेखित करून शाळेच्या प्रगतीसाठी मदतीची अपेक्षा व्यक्त केली. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मातृभाषेचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी प्राथमिक शिक्षण मराठी भाषेतूनच होणे आवश्यक असल्याचे सांगून सर्वांनी मराठी शाळांना प्राधान्य द्यावे, असे आवाहन केले.
या कार्यक्रमात ज्येष्ठ माजी विद्यार्थ्यांचा डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. व्यासपीठावर मंत्री सामंत यांच्यासह वैदेही रानडे, समिती अध्यक्ष श्रीकांत मेहेंदळे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गिरीश बापट, कवी केशवसुत स्मारक समितीचे अध्यक्ष गजानन पाटील, तहसीलदार राजाराम म्हात्रे, गटविकास अधिकारी चेतन शेळके, माध्यमिक उपशिक्षणाधिकारी नरेंद्र गावंड, गटशिक्षणाधिकारी डॉ. दत्तात्रय सोपनुर, शिक्षण विस्तार अधिकारी सविता तोटावार, मालगुंड सरपंच श्वेता खेऊर, माजी सभापती साधना साळवी, मालगुंड हायस्कूलचे मुख्याध्यापक बिपिन परकर, संचालक रोहित मयेकर, शिवसेनेचे तालुकाप्रमुख बाबू म्हाप, पोलीस निरीक्षक कुलदीप पाटील यांसह इतर मान्यवर उपस्थित होते.
महिला बचत गटाच्या भगिनी, विद्यार्थी, पालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व मालगुंड ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे निवेदन कवठेवाडी शाळेचे मुख्याध्यापक व व्याख्यानकार माधव अंकलगे यांनी केले, तर आभार प्रदर्शन समितीचे कोषाध्यक्ष डॉ. संतोष केळकर यांनी केले.