(साखरपा / भरत माने)
तालुक्यातील कोंडगाव-बाईंगवाडी येथे नेरूळ, नवी मुंबई येथील इच्छापूर्ती श्री दत्त दिगंबर स्वामी मंदिराच्या सौजन्याने आयोजित करण्यात आलेला भव्य धार्मिक आणि आध्यात्मिक सोहळा मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी पंचक्रोशीतील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आध्यात्मिक लाभ घेतला.
संपूर्ण कार्यक्रम ॐ श्री श्री १००८ महामंडलेश्वर सद्गुरू दिगंबरानंद सरस्वती स्वामी यांच्या पवित्र मार्गदर्शनाखाली पार पडला. त्यांच्या आध्यात्मिक विचारांचा प्रभाव संपूर्ण परिसरात जाणवत असून समाजात भक्ती, संस्कार आणि अध्यात्माची जागृती करण्याचे कार्य ते सातत्याने करत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनामुळे अनेक भाविकांना आध्यात्मिक दिशा मिळत असून दत्तभक्तांमध्ये त्यांच्याबद्दल विशेष श्रद्धा आणि आदरभाव निर्माण झाला आहे.
दोन दिवसीय धार्मिक कार्यक्रमात श्री सत्यदत्त पूजन, शिवपिंडीवर बिल्वपत्र अभिषेक, दत्तयज्ञ, सामूहिक पारायण, हरिपाठ, प्रवचन, भजन, महाआरती तसेच महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. वेदमंत्रांच्या घोषात आणि धार्मिक विधींमुळे संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला होता.
कार्यक्रमादरम्यान भाविकांनी मोठ्या भक्तिभावाने विविध धार्मिक विधींमध्ये सहभाग घेतला. महाप्रसादाचाही हजारो भाविकांनी लाभ घेतला. या धार्मिक सोहळ्यामुळे परिसरात अध्यात्मिक आणि सकारात्मक वातावरण निर्माण झाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मंदिराचे पदाधिकारी, सभासद, कोंडगाव-बाईंगवाडी येथील सावंत बंधू, ग्रामस्थ तसेच कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. त्यांच्या नियोजनबद्ध आयोजनामुळे संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडला.

