(देवळे / प्रकाश चाळके)
संगमेश्वर तालुक्यातील देवळे-चाफवली परिसराला अवकाळी पावसाने आणि जोरदार वादळी वाऱ्याने आज पुन्हा झोडपून काढले. ढगांच्या गडगडाटासह झालेल्या या मुसळधार पावसामुळे आंबा आणि काजू पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अनेक ठिकाणी पडझडही झाली आहे. अचानक आलेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांची एकच धांदल उडाली.
गुरुवारी झालेल्या अवकाळी पावसानंतर आज पुन्हा पावसाने हजेरी लावल्याने बागायतदारांचे मोठे नुकसान झाले आहे. कालच्या पावसाच्या भीतीने देवळे-चाफवली परिसरातील शेतकऱ्यांनी सकाळपासून आंबा काढण्याची लगबग सुरू केली होती. मात्र दुपारनंतर अचानक हवामानात बदल झाला आणि जोरदार वाऱ्यासह पाऊस सुरू झाल्याने सर्व प्रयत्नांवर पाणी फिरले.
मे महिना हा आंबा आणि काजू हंगामासाठी महत्त्वाचा मानला जातो. याच काळात मोठ्या प्रमाणात उत्पादन मिळत असते. मात्र वादळी वाऱ्यामुळे झाडांवरील सर्वच आंबा खाली पडला असून उरलेला आंबा पावसामुळे खराब होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. काजू पिकालाही मोठा फटका बसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
स्थानिकांच्या मते, गुरुवारी झालेल्या पावसापेक्षाही आजचा पाऊस आणि वाऱ्याचा वेग अधिक तीव्र होता. त्यामुळे बागायतींसह इतर मालमत्तांचेही नुकसान झाले आहे.
दरम्यान, लग्नसराईचा हंगाम सुरू असल्याने परिसरात काही ठिकाणी हळद उतरवण्याचे कार्यक्रमही आयोजित करण्यात आले होते. मात्र पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे वीजपुरवठा खंडित झाल्याने अनेक कार्यक्रमांवर विरजण पडले आणि नागरिकांचा हिरमोड झाला.

