(संगमेश्वर /एजाज पटेल)
संगमेश्वर तालुक्यातील कळंबस्ते भिमनगर येथे एका अज्ञात व्यक्तीने फळबागेला आग लावल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या भीषण आगीत रक्तचंदन, आंबा आणि विविध प्रकारच्या सुमारे ३४० हून अधिक मौल्यवान झाडांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, याप्रकरणी संगमेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस प्रशासना कडून प्राप्त माहिती नुसार ही घटना २९ मार्च २०२६ रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास कळंबस्ते भिमनगर येथील सामूहिक जागेत घडली. फिर्यादी संकेत सिद्धार्थ मोहिते (वय ३९) हे मूळचे कळंबस्ते येथील रहिवासी असून सध्या कामानिमित्त मुंबईत वास्तव्यास आहेत. कळंबस्ते येथील सर्व्हे नंबर २०/१९ आणि २०/२१ मधील त्यांच्या मालकीच्या व सामूहिक जागेत त्यांनी गेल्या काही वर्षांपासून मोठ्या कष्टाने विविध प्रकारच्या झाडांची लागवड केली होती.
या जागेत साधारण १५० रक्तचंदन आणि पांढऱ्या चंदनाची झाडे होती. तसेच हापूससह वेगवेगळ्या जातींची १४० आंब्याची झाडे आणि शेवगा, काळीमिरी, आवळा, फणस, काजू, पेरू, रातांबी, चिकू अशी इतर ५० झाडे जोमाने वाढत होती. २९ मार्च रोजी दुपारी अज्ञात इसमाने या बागेला आग लावली. उन्हाचा तडाखा आणि वाळलेले गवत यामुळे ही आग वेगाने पसरली आणि पाहता पाहता सर्व झाडे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. या आगीत फिर्यादी यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
आपल्या कष्टाने लावलेल्या बागेचे नुकसान झाल्याचे लक्षात येताच संकेत मोहिते यांनी संगमेश्वर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. ३१ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ७.३१ वाजता याप्रकरणी गु.र.नं. २३/२०२६ नुसार भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ च्या कलम ३२६ (फ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही आग कोणीतरी मुद्दामहून लावली असल्याचा संशय फिर्यादी यांनी पोलीस तक्रारीत व्यक्त केला आहे.
या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, शेतकऱ्यांनी कष्टाने जोपासलेल्या बागांना अशा प्रकारे लक्ष्य केले जात असल्याने संताप व्यक्त होत आहे. पोलीस आता या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, आग लावणारा अज्ञात आरोपी नेमका कोण आहे आणि आग लावण्यामागचा नेमका उद्देश काय होता, याचा शोध पोलीस घेत आहेत.

