(देवरूख / प्रतिनिधी)
नामदेव समाजोन्नती परिषदेच्या रत्नागिरी जिल्ह्याची सभा दि. ११ जाने. रोजी देवरुख येथे प्रसन्न जेष्ठ नागरीक संघाच्या कार्यालयामध्ये सभा राज्याध्यक्ष संजय नेवासकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. रत्नागिरी जिल्हाध्यक्ष दत्तात्रय भस्मे यांनी उपस्थितांचे स्वागत केले
या सभेला राज्याध्यक्ष संजय नेवासाकर, मुख्य विश्वस्त राजेंद्र पोरे, सचिव प्रविण शिंत्रे, विक्रात डोंगरे, कोकण विभागीय उपाध्यक्ष अनंतराव टमके, संगमेश्वर तालुका अध्यक्ष अशोक कुमटेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
या सभेत जिल्हा कार्यकारिणी निवडण्यात आली. तसेच सर्व तालुक्यांच्या अध्यक्षांची ही नेमणूक करण्यात आली. रत्नागिरी जिल्हाध्यक्ष दत्तात्रय भस्मे यांनी प्रास्ताविकामध्ये जिल्ह्यामध्ये सद्य स्थितीतील समाजाबांधवांच्या कामाचा आढावा घेऊन आपण समाजाचे काही देणे लागतो याचे सर्वांनी भान ठेवून समाजोपयोगी कामे करुया, असे आवाहन केले. तसेच यावेळी समाज बांधवांनी आपली मनोगते व्यक्त करुन समाजाला कसे उज्वल भविष्य प्राप्त करता येईल याबाबत मार्गदर्शन केले.
सदर सभेमध्ये नुकत्याच झालेल्या नगरपंचायत व नगरपरिषद निवडणुकीमध्ये सौ. साक्षी किशोर मानकर ( लांजा), सौ. वर्षा परशुराम ढेकणे (रत्नागिरी), अंकूश अशोक आवले (चिपळूण), सिध्देश वेल्हाळ (देवरुख) नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. त्यांचा सत्कार समारंभ जिल्हाकार्यकारिणी व संगमेश्वर तालुका शिंपी समाज यांच्या वतीने करण्यात आला.
राज्याध्यक्ष संजय नेवासकर यांनी पंढरपूर येथे उभारण्यात येणार असलेल्या नामदेव महाराजांच्या मंदीराबाबत माहिती देऊन राज्यामध्ये तसेच देशपातळीवर नामदेव शिंपी समाज जे कार्य करित आहे, त्याबद्दल माहिती दिली व सर्वांनी एकसंध राहून पुढील वाटचाल करुया असे आवाहन केले.
सदर सभेचे सूत्रसंचालन सौ. श्वेता दत्तात्रय भस्मे यानी केले तर आभार सौ. तृप्ती अशोक कुमटेकर यांनी मानले.

