(गणपतीपुळे / वैभव पवार)
लॉर्ड बुद्धा फाऊंडेशन यांच्या वतीने सैतवडे बलभिमवाडी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान गौतम बुद्ध यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त रविवार, १० मे रोजी विविध सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हा भव्य सोहळा न्यू इंग्लिश स्कूल सैतवडेच्या पटांगणात पार पडणार असून परिसरातील नागरिकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे.
कार्यक्रमाची सुरुवात रात्री ९ वाजता लहान मुलांच्या रेकॉर्ड डान्स स्पर्धेने होणार आहे. त्यानंतर सभा, मान्यवरांचा सत्कार आणि जीवन गौरव पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यावेळी विलासराव कोळेकर यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात येणार आहे. विलासराव कोळेकर हे दि मॉडेल इंग्लिश स्कूल सैतवडेचे मुख्याध्यापक तसेच महाराष्ट्र पत्रकार संघाचे अध्यक्ष आहेत.
यानंतर रात्री १०.३० वाजता “हा छंद प्रियेचा” या नाट्यप्रयोगाचे सादरीकरण होणार आहे. या नाट्यप्रयोगात लोकप्रिय दिग्दर्शक प्रसाद धोपट तसेच स्टार प्रवाहवरील “हळद रुसली कुंकू हसलं” मालिकेतील ‘पूजा’ भूमिका साकारणारी अभिनेत्री ज्योती निमसे सहभागी होणार असल्याने कार्यक्रमाची उत्सुकता अधिक वाढली आहे.
या संयुक्त जयंती सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन लॉर्ड बुद्धा फाऊंडेशन, सैतवडे बलभिमवाडी यांच्या वतीने करण्यात आले आहे.

