(संगमेश्वर / एजाज पटेल)
संगमेश्वर तालुक्यात अवकाळी पावसाने आज सलग दुसऱ्या दिवशीही धुमाकूळ घालत नागरिकांसह आंबा बागायतदारांची चिंता वाढवली आहे. दिवसभर कडक उन्हाने अंगाची लाहीलाही होत असतानाच सायंकाळी अचानक हवामानात बदल झाला आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली.
गुरुवारी झालेल्या अवकाळीनंतर आजही निसर्गाने आपला लहरीपणा कायम ठेवला. दिवसभर उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना सायंकाळी काहीसा दिलासा मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र सूर्यास्ताच्या सुमारास अचानक आकाशात काळे ढग दाटून आले आणि वातावरणात मळभ पसरले. सोसाट्याचा वारा सुटल्यानंतर सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली.
सुरुवातीच्या पंधरा ते वीस मिनिटांत पावसाने जोरदार बॅटिंग केली, तर त्यानंतर रिमझिम स्वरूपातील पाऊस अर्धा तासाहून अधिक काळ सुरू राहिला. या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले असून जनजीवन विस्कळीत झाले.
आंबा बागायतदारांची चिंता वाढली
अवकाळी पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण होण्याऐवजी उकाड्यात आणखी वाढ झाली आहे. घामाच्या धारांनी नागरिक हैराण झाले असतानाच आंबा बागायतदारांच्या काळजाचा ठोका चुकला आहे. झाडांवर शिल्लक असलेला आंबा तसेच सध्या रानात मिळणाऱ्या रानमेव्यावर या पावसाचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेषतः आंब्यावर डाग पडणे, फळगळी वाढणे आणि गुणवत्तेवर परिणाम होण्याची भीती निर्माण झाल्याने बागायतदार हवालदिल झाले आहेत.
परराज्यातील मजुरांचेही मोठे हाल
या अवकाळी पावसाचा फटका परराज्यातून आलेल्या मजुरांनाही बसला आहे. ठिकठिकाणी तात्पुरत्या झोपड्यांमध्ये वास्तव्यास असलेल्या मजुरांच्या निवाऱ्यांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने त्यांची मोठी गैरसोय झाली. संसारोपयोगी वस्तू आणि सामान वाचवण्यासाठी सुरू असलेली त्यांची धडपड पाहून हळहळ व्यक्त केली जात होती.
गेल्या वर्षीही मे महिन्याच्या सुरुवातीलाच अशाच प्रकारे अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला होता. त्यामुळे यंदाचा हा पाऊस केवळ अवकाळीचा इशारा आहे की मान्सूनच्या लवकर आगमनाची चाहूल, याबाबत संगमेश्वर परिसरात चर्चांना उधाण आले आहे.

