(रत्नागिरी)
काही महिन्यांपूर्वी रत्नागिरी पोलीस दलातील शहर पोलीस निरिक्षक सणस यांनी अवैध सावकारीतून नागरिकांची पिळवणूक करणाऱ्या सावकारांवर कारवाईचा बडगा उगारून एकप्रकारे चांगलीच धडकी भरवली होती. या प्रकरणातून त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले. त्यांची रत्नागिरीतून बदली करण्यात आली. त्यावेळी चर्चेतील सावकार निलेश किर चे एका प्रकरणातून असंख्य कारनामे उघड झाले होते. मात्र त्यानंतर पुन्हा सर्वसामान्य नागरिकांच्या आर्थिक अडचणी व दुर्बलतेचा फायदा घेत शहरात फोफावत चाललेली अवैध सावकारी अनेकांच्या संसाराची राखरांगोळी करीत आहे. पोलिसांची कारवाईची मोहीम पूर्णतः थांडवल्याने पोलीस यंत्रणेवर आता प्रश्न निर्माण होत आहे.
जिल्ह्यात पुन्हा सावकारीने डोकं वर काढले आहे. चर्चेतील सावकार निलेश किर याचे पुन्हा एक प्रकरण बाहेर आले असून थेट पोलिस ठाण्यात पोहोचले आहे. या प्रकरणात किर समवेत एक वकील देखील सामील आहे. पैशाच्या बदल्यात २५ एकर जमीन घेतली. कोरे चेकची धमकी दिली, ती जमीन नको असल्याने पुन्हा मध्यस्ती यांना घेण्यास तगादा लावला. मध्यस्तीने ही जमीन घेण्याचा निर्णय घेतला. मात्र आता जमिनीचे खरेदीखत न केल्याने २२ लाख ७२ हजार रुपये स्वीकारत फसवणूक केल्याप्रकरणी प्रचंड चर्चेत राहिलेल्या निलेश किर या सावकारासह एका वकिलाविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फसवणुकीची ही घटना १५ मार्च २०१७ ते २० जानेवारी २०२५ या कालावधीत घडली आहे. निलेश किर (रा. मिऱ्या, रत्नागिरी) असे या प्रकरणातील सावकाराचे नाव असून ॲड. महेश नलावडे अशी गुन्हा दाखल झालेल्या दोन संशयितांची नावे आहेत. त्यांच्या विरोधात संदीप मधुकर वेलोंडे (४५ ) यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. संदीप वेलोंडे यांनी यापूर्वी निलेश कीरकडून १० टक्के व्याजाने २५ हजार रुपये घेतले होते. ते त्यांनी सव्याज परतफेडही केले होते. त्या नंतर वेलोंडे यांचा मित्र सुभाष गराटे यांना १० लाख रुपयांची गरज होती. वेलोंडे यांनी कीर सोबत गराटेची भेट करुन दिली. निलेश किरने सुभाष गराटेना १० लाख रुपये देऊन रक्कम व्याजासह सहा महिन्यात परत न केल्यास गराटे यांची ओरी येथील २५ एकर जमीन कीर यांच्या नावावर करून देण्याबाबत बोलणी झाली.
सहा महिन्यात गराटे यांनी पैसे परत केले नाहीत. त्यामुळे निलेश कीरने गराटे यांच्या नावावरील २५ एकर जमीन आपल्या नावावर करून घेतली होती. जमीन नावावर करून दिल्यानंतर गराटे मुंबईला निघून गेले होते व काही दिवसांनी ते पुन्हा रत्नागिरीत आल्यावर त्यांचा किरसोबत वाद झाला होता. तेव्हा त्यांनी मध्यस्थी संदीप वेलोंडेना बोलावून घेतले. पैशाच्या बदल्यात २५ एकर जमीन तुम्हाला गराटे यांनी दिली आहे. त्यामुळे हा विषय आता तुम्ही येथेच थांबवा, असा सल्ला वेलोंडे यांनी दिला. यावेळी निलेश कीरने तुझे कोरे चेक माझ्याकडे आहेत. तुझी वाटच लावून टाकतो, अशी धमकी वेलोंडे यांना दिली.
दरम्यान, ही जमीन कीरला नको असल्याने कीरने मध्यस्थी वेलोंडे यांनाच ती विकत घेण्याचा तगादा लावला. त्याच्या त्रासाला कंटाळून ही जमीन वेलोंडे यांनी खरेदी करण्याचा निर्णय घेतला. कीरने या जमिनीचा दर २५ लाख रुपये सांगितला. वेलोंडे यांचे मित्र देवरूखकर आणि कीर यांचे वकील ॲड. महेश नलावडे यांच्या माळनाका येथील कार्यालयात जमिनीच्या व्यवहाराची बोलणी झाली. जमिनीचा दर २२ लाख ७२ हजार ठरला. ॲड. महेश नलावडेच्या कार्यालयात त्यांनी कीरच्या सांगण्यानुसार जागेचे खरेदीखत तयार केले होते. ठरल्याप्रमाणे रक्कम कीर याला देण्यात आली. त्यानंतर वकिलांसमोर या खरेदीखतावर सह्या झाल्या. कीर याने हातात रक्कम पडल्यानंतर ही रक्कम मी घरी ठेवून येतो, तुम्ही रजिस्टर ऑफिसला या असे सांगितले. त्यानुसार कीर रक्कम घेऊन घरी निघून गेला व वेलोंडे, देवरूखकर नामक व्यक्ती आणि कीरचे वकील ॲड. महेश नलावडे हे तिघे रजिस्टर कार्यालयात पोहोचले.
एक तास झाला तरी कीर त्या ठिकाणी आलाच नाही. त्यामुळे ॲड. नलावडेने वेलोंडे आणि देवरूखकर यांना तुमचे खरेदीखत मी करून देतो, तुम्ही काळजी करू नका, असे सांगून त्या दोघांना घरी पाठवून दिले. त्यानंतर कीरशी वेलोंडे आणि देवरूखकर यांनी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. परंतू किरने प्रतिसाद दिला नाही. वकिलानेही उडवाउडवीची उत्तरे दिली. पैसेही गेले, जमीनही गेली असे लक्षात आल्यानंतर वेलोंडे यांनी शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली. या प्रकरणात पोलिसांनी संशयितांविरोधात भारतीय न्याय संहिता कलम ३१८ (४ ), ३०८ (३ ), ३ (५ ), महाराष्ट्र सावकारी अधिनियम २०१४ चे कलम ४४ , ४५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास शहर पोलीस करीत आहेत.