(पोलादपूर /शैलेश पालकर)
जुन्या कशेडी घाट परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. येलंगेवाडीच्या हद्दीत बिबट्याने पार्टेवाडी येथील शेतकरी तुकाराम रावजी जाधव उर्फ पार्टे यांच्या दुभत्या गायीवर हल्ला करून तिला ठार केले. रविवारी दुपारी ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरातील ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. वनविभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
रविवारी सकाळी तुकाराम जाधव यांनी नेहमीप्रमाणे आपली गाय चरण्यासाठी रानात सोडली होती. दुपारपर्यंत ती परत न आल्याने त्यांनी शोध सुरू केला. यावेळी जुन्या कशेडी घाटातील येलंगेवाडीच्या हद्दीत गाय अर्धवट खाल्लेल्या अवस्थेत आढळली. बिबट्याने तिच्यावर हल्ला करून ठार केल्यानंतर घटनास्थळावरून पळ काढल्याचे दिसून आले. ऐन दिवाळीच्या सणात दुभती गाय गमावल्याने जाधव कुटुंबाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. दूध विक्रीतून या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत होता. त्यामुळे उत्पन्नाचे साधनच हिरावल्याने कुटुंबावर उपासमारीची वेळ आल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
मुंबई-गोवा महामार्गावरील जुन्या कशेडी घाटाचा परिसर दोन्ही बाजूंनी घनदाट जंगल, डोंगर आणि दऱ्याखोऱ्यांनी व्यापलेला आहे. जुन्या महामार्गावरील रस्त्याच्या दुरुस्तीचे काम संथगतीने सुरू असल्याने या मार्गावर वाहनांची वर्दळही तुरळक झाली आहे. परिणामी, परिसरात दिवसाढवळ्या बिबट्याचा वावर जाणवत असल्याचे पार्टेवाडीतील रहिवासी चंद्रकांत जाधव, भारत जाधव आणि पळचिल गावातील प्रेम निविलकर यांनी सांगितले. बिबट्याच्या उपस्थितीमुळे ग्रामस्थ, शेतकरी आणि गुराख्यांमध्ये भीती पसरली आहे.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलादपूर वनविभागाचे वनपाल बाजीराव पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन स्पॉट पंचनामा केला. गाय गमावलेल्या शेतकऱ्याला नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे त्यांनी सांगितले. तसेच ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांनी घाबरून न जाता खबरदारी घ्यावी, असे आवाहन केले. विशेषतः रात्रीच्या वेळी घराबाहेर पडताना बॅटरी आणि हातात काठी ठेवावी तसेच एकट्याने ये-जा करणे टाळावे, अशा सूचना वनविभागाने दिल्या आहेत.
दरम्यान, परिसरातील ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी बिबट्याच्या वाढत्या वावराच्या पार्श्वभूमीवर वनविभागाने तातडीने उपाययोजना करून त्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली आहे.


