(गावखडी / वार्ताहर)
रत्नागिरी तालुक्यातील मेर्वी गुरववाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला अद्याप स्वतंत्र इमारत उपलब्ध झालेली नसल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. सध्या या शाळेचे वर्ग बालवाडीच्या इमारतीत भरवले जात असून, शाळेची शैक्षणिक प्रगती उल्लेखनीय असतानाही भौतिक सुविधांच्या अभावाचा प्रश्न कायम आहे.
मेर्वी गुरववाडी येथील ही शाळा सेमी इंग्रजी माध्यमाची असून शाळेची शैक्षणिक प्रगती उत्तम आहे. दरवर्षी शाळेतील विद्यार्थी मंथन, स्कॉलरशिप तसेच अन्य स्पर्धा परीक्षांमध्ये सहभागी होतात. या परीक्षांमध्ये शाळेचा १०० टक्के निकाल लागत असल्याचे सांगण्यात आले आहे. आवश्यक भौतिक सुविधा पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसतानाही शाळेतील विद्यार्थ्यांनी शैक्षणिक क्षेत्रात उत्तुंग प्रगती साधली आहे.
शाळेला स्वतंत्र इमारत मिळावी यासाठी ग्रामपंचायत मेर्वीच्या वतीने वारंवार परिपूर्ण प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात आले आहेत. या प्रस्तावाची दखल घेत जिल्हा शिक्षण विभाग प्रशासनाने जा.क्र. रजिप./शिक्षण/प्राथ/टे.१/७८५/२०२५, दिनांक २८/०१/२०२५ या पत्रानुसार शिफारस केली होती. तसेच शाळेच्या इमारतीसाठी निधी उपलब्ध करून देण्याची विनंती ना. श्री. उदयजी सामंत, मंत्री उद्योग व मराठी भाषा तथा पालकमंत्री रत्नागिरी जिल्हा, मंत्रालय, मुंबई यांच्याकडे करण्यात आली होती. मात्र, अद्याप या शाळेच्या इमारतीसाठी निधी मंजूर झालेला नाही.
चालू सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेतून शाळेला निधी उपलब्ध होईल, अशी अपेक्षा पालकवर्ग आणि ग्रामस्थांना आहे. त्यामुळे स्वतंत्र इमारतीच्या मागणीसाठी पालक आणि ग्रामस्थ निधी मंजुरीच्या प्रतीक्षेत असून, याबाबत लवकर निर्णय होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
सध्या मेर्वी गुरववाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचे वर्ग बालवाडीच्या इमारतीत भरत आहेत. शाळेची शैक्षणिक कामगिरी समाधानकारक असतानाही स्वतंत्र इमारत नसल्याने विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक वातावरण आणि भौतिक सुविधा मिळण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे मेर्वी गुरववाडी जि.प. प्राथमिक शाळेसाठी स्वतंत्र इमारत उभारण्यास निधी उपलब्ध करून देण्याची मागणी पालकवर्ग आणि ग्रामस्थांकडून होत आहे.


