(रत्नागिरी /प्रतिनिधी)
प्रेमसंबंध तुटल्याच्या रागातून तरुणीचा गळा आवळून खून केल्याचा आरोप असलेल्या तरुणाची रत्नागिरी जिल्हा व सत्र न्यायालयाने पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे. नांदिवडे अंबुवाडी येथे २०२२ मध्ये घडलेल्या या प्रकरणाने त्यावेळी जिल्ह्यात मोठी खळबळ उडवली होती.
समीर प्रकाश पवार (वय २३, रा. आगरनरळ, शिंदेवाडी, रत्नागिरी) असे निर्दोष मुक्त करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश अनिलकुमार अंबाळकर यांनी या खटल्याचा निकाल सुनावत आरोपीविरुद्धचे आरोप सिद्ध होत नसल्याचे निरीक्षण नोंदवले. या प्रकरणातील मयत तरुणी चैताली संतोष पांचाळ (रा. नांदिवडे) हिचा मृतदेह २४ एप्रिल २०२२ रोजी अंबुवाडी येथील आंबा बागेत संशयास्पद अवस्थेत आढळून आला होता. ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या स्थितीत मृतदेह आढळल्याने सुरुवातीला आत्महत्येची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. मात्र, मृतदेहाची स्थिती संशयास्पद असल्याने तिच्या कुटुंबीयांनी घातपाताचा संशय व्यक्त केला होता.
तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, समीर पवार आणि चैताली पांचाळ यांच्यात सुमारे दोन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मात्र, काही महिन्यांपासून दोघांमध्ये वाद निर्माण झाले होते. चैतालीने हे संबंध तोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर आरोपीकडून तिला वारंवार भेटण्याचे प्रयत्न होत असल्याचा दावा पोलिस तपासात करण्यात आला होता. याच पार्श्वभूमीवर प्रेमसंबंध तुटल्याच्या रागातून खून झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. चैताली ही जयगड येथील एका मेडिकल स्टोअरमध्ये कामाला होती. २३ एप्रिल २०२२ रोजी रात्री कामावरून परतताना मेडिकल स्टोअरच्या मालकिणीने तिला नेहमीप्रमाणे नांदिवडे अंबुवाडी येथील पाण्याच्या टाकीजवळ सोडले होते. मात्र, त्या रात्री ती घरी न परतल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. दुसऱ्या दिवशी सकाळी तिचा मृतदेह आंबा बागेत आढळून आला.
या घटनेनंतर चैतालीच्या वडिलांनी जयगड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी समीर पवार याच्याविरोधात भारतीय दंड विधान कलम ३०२ अंतर्गत गुन्हा दाखल करून तपास पूर्ण करत न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते. मात्र, सुनावणीदरम्यान सादर करण्यात आलेल्या पुराव्यांमध्ये ठोस साखळी सिद्ध न झाल्याने न्यायालयाने आरोपी समीर पवार याची निर्दोष मुक्तता केली. या निकालामुळे प्रकरणाला महत्त्वपूर्ण वळण मिळाले आहे.

