(मुंबई)
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये झालेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून राज्याचा एकूण निकाल ९२.०९ टक्के लागला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा निकालात सुमारे २ टक्क्यांची घसरण झाली आहे.
राज्य मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत निकालाची माहिती दिली. दरवर्षीप्रमाणे यंदाही कोकण विभागाने राज्यात अव्वल स्थान कायम राखत ९७.६२ टक्के निकाल नोंदवला आहे. तर छत्रपती संभाजीनगर विभागाचा निकाल सर्वात कमी, ८८.४१ टक्के लागला आहे.
यंदाच्या निकालात मुलींनी पुन्हा एकदा बाजी मारली असून मुलींची उत्तीर्णतेची टक्केवारी ९४.९६ इतकी आहे. मुलांची टक्केवारी ९०.५६ इतकी नोंदवली गेली आहे.
राज्यातील पुणे, नागपूर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, छत्रपती संभाजीनगर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून एकूण १५ लाख ५५ हजार ०२६ नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १५ लाख ४२ हजार ४७२ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले होते. त्यापैकी १४ लाख २० हजार ४८६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
राज्यातील ६ हजार ६१२ शाळांचा निकाल शंभर टक्के लागला असून ४ लाख ८२ हजार विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. यंदा घेण्यात आलेल्या ६४ विषयांपैकी २० विषयांचा निकाल १०० टक्के लागल्याची माहिती मंडळाचे सचिव डॉ. दीपक माळी यांनी दिली.
दिव्यांग विद्यार्थ्यांचाही निकाल उल्लेखनीय ठरला आहे. राज्यभरातून १० हजार ३१ दिव्यांग विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ९ हजार ९१२ विद्यार्थी परीक्षेला बसले होते आणि ९ हजार ४२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यांची उत्तीर्णतेची टक्केवारी ९१.२२ इतकी आहे.
विभागनिहाय निकाल
कोकण – ९७.६२%
मुंबई – ९४.९७%
कोल्हापूर – ९५.४७%
पुणे – ९४.२४%
अमरावती – ९०.५०%
नाशिक – ९०.५३%
नागपूर – ८९.०७%
लातूर – ८८.४२%
छत्रपती संभाजीनगर – ८८.४१%
दरम्यान, विद्यार्थ्यांना गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती आणि पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

