( नाशिक / वृत्तसंस्था )
भक्तांच्या अंधश्रद्धेचा गैरफायदा घेत कोट्यवधी रुपयांची संपत्ती उभारणारा भोंदू अशोककुमार उर्फ ‘कॅप्टन’ खरात याच्या आर्थिक साम्राज्याचा अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मोठा पर्दाफाश केला आहे. भक्तांकडून उकळलेल्या पैशांची विल्हेवाट लावण्यासाठी खरातने तब्बल १४२ बनावट बँक खात्यांचे जाळे निर्माण केल्याचा धक्कादायक खुलासा ईडीच्या तपासात झाला आहे. या प्रकरणी मुंबईतील विशेष न्यायालयात सुमारे तीन हजार पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले असून, पुढील सुनावणी १ ऑगस्ट रोजी होणार आहे.
ईडीच्या तपासानुसार, अशोक खरातने अंधश्रद्धेला व्यावसायिक स्वरूप देत भक्तांची मोठ्या प्रमाणावर आर्थिक फसवणूक केली. चमत्काराच्या नावाखाली तो चिंचेच्या बिया प्रत्येकी २ लाख रुपयांना, तर मधाच्या बाटल्या आणि तथाकथित चमत्कारी खडे प्रत्येकी ९ लाख रुपयांपर्यंत विकत होता. भक्तांना स्वतःकडे अलौकिक शक्ती असल्याचा विश्वास बसावा यासाठी तो आधुनिक तंत्रज्ञानाचाही वापर करत होता. आश्रमात आणि घरात भीतीचे वातावरण निर्माण करण्यासाठी रिमोट कंट्रोलवर चालणारे बनावट साप, वाघाचे कातडे आणि इतर साहित्याचा वापर करण्यात येत असल्याचे तपासात समोर आले आहे. या मानसिक दडपणाचा फायदा घेत अनेक महिला भक्तांचे लैंगिक शोषण झाल्याचाही गंभीर आरोप ईडीने आपल्या आरोपपत्रात केला असून, हा केवळ आर्थिक गुन्हा नसून मानवी शोषणाचाही प्रकार असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
सरकारवाडा पोलिस ठाण्यात २५ मार्च रोजी खंडणीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर ईडीने ६ एप्रिल रोजी मनी लॉन्डरिंग प्रतिबंधक कायदा (PMLA) अंतर्गत स्वतंत्र गुन्हा नोंदवून तपास सुरू केला होता. या प्रकरणात अशोक खरातसह त्याची पत्नी कल्पना अशोक खरात, अरविंद पांडुरंग बावके, नामकर्ण यशवंत आवारे, अविनाश वामन कांडेकर आणि मिलिंद दादासाहेब बनकर यांचाही आरोपी म्हणून समावेश करण्यात आला आहे. ईडीने या खटल्यात ३० महत्त्वाच्या साक्षीदारांचे जबाब नोंदवले असून, १ ऑगस्ट रोजी होणाऱ्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
ईडीच्या आरोपपत्रानुसार, अशोक खरातने अंधश्रद्धा, चमत्कार आणि धार्मिक आडोशाचा वापर करून भक्तांची तब्बल ४२ कोटी ८८ लाख रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणात नाशिक, सिन्नर, शिर्डी आणि राहता येथे एकूण १७ गुन्हे दाखल असून, मोठ्या प्रमाणात बेनामी व्यवहार झाल्याचाही संशय व्यक्त करण्यात आला आहे.
तपासादरम्यान ईडीने १३ कोटी ९२ लाख रुपयांची रोख रक्कम, ५ लाख १८ हजार रुपयांचे परकीय चलन, २ कोटी ६० लाख रुपयांच्या मुदतठेवी (एफडी), १ कोटी १२ लाख रुपयांचे दागिने, १९ कोटी २० लाख रुपयांची स्थावर मालमत्ता तसेच मर्सिडीज-बेंझसह आलिशान वाहने जप्त केली आहेत. ईडीच्या तपासातून समोर आलेल्या या धक्कादायक खुलाशांमुळे राज्यभरात खळबळ उडाली असून, आता १ ऑगस्ट रोजी होणाऱ्या न्यायालयीन सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

