(रत्नागिरी / प्रतिनिधी)
यंदा २७ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवानिमित्त मुंबईसह राज्यभरातून कोकणात आपल्या लाडक्या बाप्पाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांची गैरसोय होऊ नये म्हणून एसटी महामंडळाने तब्बल ५००० विशेष बसगाड्यांची वाहतूक करण्याचा निर्णय घेतला आहे. या सेवेसाठी २३ ऑगस्टपासून ते ५ सप्टेंबरपर्यंत विशेष गाड्या धावणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रसाद लाड सरनाईक यांनी दिली.
गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळ, वाहतूक विभाग आणि अन्य यंत्रणांच्या उपस्थितीत मंत्री सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीत चाकरमान्यांच्या प्रवासाची सोय, आरक्षण सुविधा, वाहतुकीचे नियोजन यासह इतर विविध बाबींवर निर्णय घेण्यात आला.
मंत्री सरनाईक यांनी सांगितले की, “गणपती बाप्पासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची सेवा ही एसटी महामंडळाची जबाबदारी आहे. यंदा मागणी लक्षात घेता ५००० जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. कोकणात जाणाऱ्या आणि परत येणाऱ्या मार्गांवर ही वाहतूक राहणार आहे.”
गाड्यांचे आरक्षण public.msrtcors.com या संकेतस्थळावर किंवा MSRTC Bus Reservation App वर उपलब्ध होणार असून, सर्व जादा बसेस आरक्षित स्वरूपातच चालवण्यात येणार आहेत. कोकणात जाणाऱ्या एकलव्य योजनेतील ५०० जादा बसेस देखील यंदा गणेशोत्सवासाठी सोडण्यात येणार आहेत. प्रवाशांच्या मागणीनुसार यातील काही बसेस गणपतीसाठी आरक्षित ठेवण्यात येणार आहेत.
२२ जुलैपासून आरक्षण सुरू
यंदा आरक्षणात महिलांना ५०% आणि जेष्ठ नागरिकांना १०% सवलत मिळणार असून २२ जुलैपासून याचे आरक्षण सुरू होणार आहे. मुंबई, ठाणे, पालघर यांसारख्या ठिकाणांहून गणेशोत्सवासाठी विशेष बसगाड्या कोकणात रवाना होतील. यासाठी ३३०० विशेष गाड्या नियोजित करण्यात आल्या आहेत.

