( शिर्डी )
साईबाबांच्या दर्शनासाठी देश-विदेशातून हजारो भाविक दररोज शिर्डीत येतात. त्यात आता एका विशेष पाहुणीनेही हजेरी लावली आहे. ‘मिस ऑस्ट्रेलिया 2025’ विजेती मराठमोळी अबोली लोखंडे हिनं सहपरिवार शिर्डीत येऊन श्री साईबाबांच्या समाधीचं मनोभावे दर्शन घेतलं. अबोली ही मूळची पुण्याची रहिवासी असून गेल्या पाच वर्षांपासून ती व्यावसायानिमित्त ऑस्ट्रेलियात स्थायिक आहे.
श्रद्धा आणि सबुरीनं पूर्ण झालं स्वप्न
फॅशनच्या झगमगत्या दुनियेत आपलं स्थान निर्माण करण्याचं अबोलीचं स्वप्न लहानपणापासूनच होतं. अनेक वर्षांच्या प्रयत्नानंतरही यश मिळत नसल्याने ती काही काळ निराश झाली होती. अशावेळी साईबाबांचा ‘श्रद्धा आणि सबुरी’ हा महामंत्र तिच्या आयुष्यात नवी ऊर्जा घेऊन आला. त्या मंत्राचा आधार घेत तिनं प्रयत्न सुरू ठेवले आणि अखेर ‘मिस ऑस्ट्रेलिया 2025’ या प्रतिष्ठित किताबाने आपलं स्वप्न साकार केलं.

साईबाबांची परमभक्त
अबोली ही लहानपणापासूनच साईबाबांची परमभक्त आहे. यश मिळाल्यानंतर ती नेहमीप्रमाणे साईबाबांचे आभार मानण्यासाठी शिर्डीत आली. तिनं स्वतःला मिळालेला ‘मिस ऑस्ट्रेलिया’चा मुकुट साईबाबांच्या चरणी अर्पण करून साई समाधीचं दर्शन घेतलं आणि आरतीतही सहभाग घेतला.
अबोली सध्या आगामी ‘मिस वर्ल्ड 2025’ स्पर्धेच्या तयारीत असून, “साईबाबांच्या कृपेने मी नक्कीच मिस वर्ल्ड होईन,” असा ठाम विश्वास तिनं व्यक्त केला. श्रद्धा, सबुरी आणि मेहनत या त्रिसूत्रीवर चालणाऱ्या मराठमोळ्या अबोली लोखंडेने साईबाबांच्या आशीर्वादाने ‘मिस ऑस्ट्रेलिया’चा मान मिळवला असून, आता तिचं लक्ष्य ‘मिस वर्ल्ड’कडे आहे.
साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी अबोली लोखंडे हिचा साईबाबांची मूर्ती व शाल देऊन सत्कार केला. पुढील वाटचालीसाठी त्यांनी तिला मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

