(नागपूर)
महायुती सरकारच्या ‘गेम चेंजर’ मानल्या जाणाऱ्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत मोठा आर्थिक गैरव्यवहार उघडकीस आला आहे. या योजनेतून तब्बल 165 कोटी रुपये अपात्र लाभार्थ्यांनी घेतल्याची धक्कादायक माहिती महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी विधिमंडळात दिली. सुरुवातीला कोणतीही छाननी न करता सरसकट निधी वितरित केल्यामुळे हा प्रकार घडल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आता अपात्र लाभार्थ्यांकडून ही रक्कम वसूल करण्यासाठी सरकार प्रक्रिया राबवणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
महायुती सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत ही मोठी अपडेट मानली जात आहे. या योजनेत अपात्र लाभार्थ्यांनी 165 कोटी रुपयांचा लाभ घेतल्याची कबुली मंत्री आदिती तटकरे यांनी लेखी उत्तरात दिली आहे. विशेष म्हणजे या गैरव्यवहारात पुरुष तसेच सरकारी सेवेत असलेल्या महिला कर्मचाऱ्यांचाही सहभाग असल्याचे समोर आले आहे.
नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात लाडकी बहीण योजनेबाबत तारांकित प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. या योजनेत सुमारे 26 लाख बोगस लाभार्थी असून जवळपास 5 हजार 136 कोटी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. या पार्श्वभूमीवर आमदार प्रज्ञा सातव, अशोक जगताप, सतेज पाटील, निरंजन डावखरे, प्रवीण दरेकर यांच्यासह अन्य सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांना मंत्री आदिती तटकरे यांनी लेखी उत्तर दिले.
मंत्री तटकरे यांनी सभागृहात सादर केलेल्या आकडेवारीनुसार,
- 12 हजार 431 पुरुषांनी सुमारे 25 कोटी रुपये,
- 77 हजार अपात्र बहिणींनी सुमारे 140 कोटी रुपये,
- तर 9 हजार 526 सरकारी सेवेत असलेल्या महिला कर्मचाऱ्यांनी सुमारे 14.5 कोटी रुपये लाटले आहेत.
एकूण 165 कोटी रुपयांचा गैरवापर झाल्याचे सरकारने मान्य केले आहे.
दरम्यान, छाननीशिवाय सरकारी निधीचे वाटप झाल्यामुळे आता ही रक्कम वसूल करण्याची जबाबदारी प्रशासकीय यंत्रणेवर येणार असून, त्याचा अतिरिक्त ताण सरकारी कर्मचाऱ्यांवर पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सरकारकडून वसुलीची प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचे मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले आहे.

