( पेण )
पेण-खोपोली मार्गावरील भोगावती नदीजवळील हनुमान मंदिर परिसरात बुधवारी रात्री भीषण अपघात घडला. रस्त्यावरील मोठा खड्डा टाळण्याच्या प्रयत्नात रिक्षा थेट नदीच्या पात्रात कोसळल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी प्रशासनाच्या निष्काळजीपणाविरोधात संताप व्यक्त केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले असून वाहतूक धोकादायक बनली आहे. अपघातावेळी रिक्षाचालकाने रस्त्यातील मोठा खड्डा चुकवण्यासाठी वाहन डावीकडे वळवले. मात्र, त्या ठिकाणी कोणताही संरक्षक कठडा किंवा सुरक्षा व्यवस्था नसल्याने रिक्षा थेट भोगावती नदीत कोसळली. या भीषण अपघातात एकनाथ किसन किंजवडे (वय ५३) यांचा जागीच मृत्यू झाला. तर भूषण पाटील (रा. कराडे, पो. रसायनी) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर पेण येथील म्हात्रे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
स्थानिकांचा प्रशासनावर संताप
अपघातानंतर परिसरात मोठी गर्दी झाली होती. स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतकार्य सुरू करत जखमींना बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले. मात्र, एका व्यक्तीचा जीव वाचवता आला नाही. घटनेनंतर नागरिकांनी राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाच्या पेण शाखेवर गंभीर आरोप केले आहेत. “रस्त्याची अवस्था अत्यंत खराब असून वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नाही,” असा आरोप स्थानिकांनी केला.
सुरक्षा उपायांवर प्रश्नचिन्ह
रस्त्यावरील खड्डे, संरक्षक कठड्यांचा अभाव आणि अपुरी सुरक्षा व्यवस्था यामुळे हा अपघात घडल्याचे बोलले जात आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा रस्ते सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणी पेण पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

