(सिंधुदुर्ग /रत्नागिरी)
कोकणातील आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल चढवला आहे. गेल्या अडीच महिन्यांपासून सातत्याने आंदोलन आणि पाठपुरावा करूनही सरकारकडून ठोस प्रतिसाद मिळत नसल्याची खंत व्यक्त करत, “राजा उधार झाला आणि शेतकऱ्यांच्या हातात भोपळा दिला,” अशा शब्दांत त्यांनी सरकारच्या धोरणांवर सडकून टीका केली.
सिंधुदुर्ग येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना शेट्टी म्हणाले की, विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आंबा आणि काजू उत्पादकांच्या प्रश्नावर केवळ जुजबी चर्चा झाली. मात्र, प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या पदरात काहीही पडले नाही. नुकसानभरपाईच्या नावाखाली सरकारने कोकणातील बागायतदारांची केवळ निराशाच केली असल्याचा आरोप त्यांनी केला.
शेतकऱ्यांना जाहीर करण्यात आलेली मदत ही त्यांच्या जखमेवर मीठ चोळणारी असल्याची टीका करत, येत्या १५ मे रोजी गिरगाव चौपाटी ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानावर मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा शेट्टी यांनी केली. आम्हाला गृहीत धरण्याची चूक सरकारने करू नये; अन्यथा परिणाम गंभीर होतील, असा इशाराही त्यांनी दिला. त्यांच्या मते, सरकारने ठरवलेल्या निकषांनुसार कोकणातील शेतकऱ्यांना अवघी ७० ते ७५ कोटी रुपयांची मदत मिळणार आहे. ही मदत अत्यल्प असून, सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींचे हे मोठे अपयश असल्याचा आरोपही त्यांनी केला.
हेक्टरी २२ हजारांची मदत म्हणजे शेतकऱ्यांची थट्टा
रत्नागिरी जिल्ह्यात सुमारे ६५ हजार हेक्टर क्षेत्रावर आंबा लागवड केली जाते. दरवर्षी या आंबा व्यवसायातून सरकारला सुमारे १२७० कोटी रुपयांचे परकीय चलन मिळते. मात्र, संकटाच्या काळात सरकारने हेक्टरी केवळ २२ हजार रुपयांची मदत जाहीर करून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसल्याची टीका शेट्टी यांनी केली. ते पुढे म्हणाले की, एका हेक्टर आंबा बागेच्या व्यवस्थापनासाठी वर्षभरात तीन ते चार लाख रुपयांपर्यंत खर्च येतो. खते, कीडनाशके, मजुरी आणि देखभालीसाठी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर कर्ज काढले आहे. अशा परिस्थितीत अपुरी मदत मिळाल्याने अनेक बागायतदार आर्थिक विवंचनेत सापडले असून, काही शेतकरी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
कोकणातील शेतकरी आक्रमक
गेल्या दोन महिन्यांपासून कोकणातील शेतकरी संघटितपणे संघर्ष करत असून, सरकारकडून न्याय न मिळाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. कोकणातील आंबा बागायतदार आता शांत बसणार नाहीत, असा ठाम इशारा देत शेट्टी यांनी सरकारला शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तातडीने निर्णय घेण्याचे आवाहन केले.

